सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ७७ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक होतच असल्याने दरवाजे पावणे दहा फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ४८५१४ तर पायथा वीजगृहमधून २१०० असा मिळून ५०६१४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता.
जिल्ह्यात सध्यस्थिती पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील आठवड्यात पश्चिम भागात धो-धो पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर तापोळा, बामणोली भागात पावसाने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे कोयना धरणासह अन्य प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.
अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील साठा ९० टीएमसीच्या वर पोहोचला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सहा दराजातून विसर्ग सुरू करण्यात आला.शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास कोयना धरणात ८९.०७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर २०९८३ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर, धरणाचे सहा दरवाजे गुरुवारी सायंकाळपासून पावणे दहा फुटांवर होते.
शुक्रवारी सकाळीही दरवाजे पावणे दहा फुटांवरच स्थिर होते. दरवाजातून ४८५१४ असा एकूण ५०६१४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयनेतून सुरू होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.शुक्रवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४० मिलीमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३०४७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला ३८ आणि जूनपासून आतापर्यंत ३८५८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ७७ आणि आतापर्यंत ३९५८ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.शुक्रवारी सकाळचा धरणांतील विसर्ग धोम धरणातून ६२२७ क्यूसेक विसर्ग सुरू होता. कण्हेर ५५६०, बलकवडी ३९८, उरमोडी १९८६ आणि तारळी धरणातून १७१२ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, धोम धरणात ७२.६४ टक्के पाणीसाठा झाला होता. कोयनेत ८३.८५, बलकवडी ८२.१३, उरमोडी धरण ७२.८४ आणि तारळी धरणात ८५.८५ टक्के साठा झाला होता.