सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक होतच असल्याने दरवाजे पावणेदहा फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ४८,५१४ तर पायथा वीजगृहामधून २,१०० असा मिळून ५०,६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता.
जिल्ह्यात सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील आठवड्यात पश्चिम भागात धो-धो पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात पावसाने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे कोयना धरणासह अन्य प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. अवघ्या काही दिवसात कोयना धरणातील साठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सहा दरवाजांतून विसर्ग सुरू करण्यात आला.
शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास कोयना धरणात ८९.०७ टीएमसी पाणीसाठा झाला होता तर २०,९८३ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणाचे सहा दरवाजे गुरुवारी सायंकाळपासून पावणेदहा फुटांवर होते. शुक्रवारी सकाळीही दरवाजे पावणेदहा फुटांवरच स्थिर होते. दरवाजातून ४८,५१४ असा एकूण ५०,६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयनेतून सुरू होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४० मिलिमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३,०४७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला ३८ आणि जूनपासून आतापर्यंत ३,८५८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ७७ आणि आतापर्यंत ३,९५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
चौकट :
शुक्रवारी सकाळचा धरणांतील विसर्ग :
धोम धरणातून ६,२२७ क्युसेक विसर्ग सुरू होता. कण्हेर ५,५६०, बलकवडी ३९८, उरमोडी १,९८६ आणि तारळी धरणातून १,७१२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, धोम धरणात ७२.६४ टक्के पाणीसाठा झाला होता. कोयनेत ८३.८५, बलकवडी ८२.१३, उरमोडी धरण ७२.८४ आणि तारळी धरणात ८५.८५ टक्के साठा झाला होता.