मलकापूर : मार्च २०२०पासून कोरोना संकटाने थैमान घातले आहे. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून, प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. याचा विचार करून मलकापूर नगरपालिकेने लॉकडाऊनच्या काळातील घरपट्टीत सवलत द्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र शिवसेनेचे कऱ्हाड दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशीद-पाटील यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, गेले वर्षभर सर्वत्र टाळेबंदीची परिस्थिती आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्याकरिता, रुग्णसंख्येसह जीवितहानी रोखण्याकरिता पालिका हद्दीत वारंवार लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवनमानावर टाळेबंदीचा विपरीत प्रभाव पडून सर्वसामान्यांचे आर्थिक जीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण बाजारपेठ, व्यापारी संस्थाने, उद्योग, व्यावसायिक, फेरीवाले, रिक्षावाले व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. याचा परिणाम जनतेच्या क्रयशक्तीवर होऊन बेरोजगारी व आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बाबींमुळे मलकापूर पालिका क्षेत्रातील मालमत्ताधारक नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी, स्वच्छता आदी विविध कर भरणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, त्याचे दूरगामी परिणाम पालिका व मालमत्ताधारकांवर होणार आहेत. म्हणून याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून नागरिकांना दिलासा देण्याकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षांतील घरपट्टीत ५० टक्के सवलत द्यावी तसेच थकीत घरपट्टीवरील व्याज माफ करण्यात यावे. घरपट्टी भरण्यास हप्ते बांधून देण्यात यावेत, पाणीपट्टी बिलात ३० टक्के सवलत देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या पत्रकावर रामभाऊ रैनाक, मलकापूर शहरप्रमुख मधुकर शेलार, उपशहरप्रमुख सूर्यकांत मानकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
चौकट...
५० टक्के सवलतीची मागणी...
सर्वसामान्य नागरिकांचे थकलेल्या बिलामुळे नळ कनेक्शन तोडू नये. स्वच्छता कराच्या बाबतीतही ५० टक्के सवलत देण्याचा विचार करावा. या महत्त्वपूर्ण मागण्या पालिकेच्या पटलावर ठेवून यावर चर्चा करण्यात यावी व नगर परिषदेने सर्वसामान्य नागरिकांना सवलतीचे पॅकेज देऊन सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.