कऱ्हाड : येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समधील वनस्पतिशास्त्र विभागातील संशोधकांनी गवत कुळातील नवीन वनस्पती प्रजातीचा शोध लावला आहे. या वनस्पतीला संस्थेचे संस्थापक, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले आहे. या नवीन वनस्पतीचे ‘कॅपिलिपेडियम यशवंतराव’ असे नामकरण करण्यात आले आहे.
डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी, सायन्स अँड इंजिनिअरिंग रीसर्च बोर्ड, नवी दिल्लीच्या प्रकल्पांतर्गत सदरचे संशोधन करण्यात आले. प्रकल्पप्रमुख व महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. गिरीश पोतदार आणि डीएसटी प्रोजेक्ट फेलो तरबेज शेख यांनी या वनस्पतीचा शोध लावला. न्यूझीलंडमधील मॅग्नोलिया प्रेस, ऑकलंडद्वारा प्रकाशित होणाऱ्या ‘फायटोटॅक्सा’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये या नवीन वनस्पती प्रजातीच्या शोधाला मान्यता देण्यात आली आहे.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर ,कराडची स्थापना १९५८ ला केली. या भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना विज्ञान विषयाचे शिक्षण मिळावे म्हणून सायन्स कॉलेज कराडची स्थापना केली व दिवंगत पी. डी. पाटील यांनी समर्थपणे संस्थेचे कामकाज पाहून संस्थेचा नावलौकिक वाढवला. सध्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे संस्थेच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळत आहेत . महाविद्यालयामध्ये विविध विभागांमध्ये सतत संशोधनाचे काम चालू असते.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री पदे यशस्वीरीत्या भूषवली. त्यांनी आपले महाराष्ट्र राज्य व देश यांची विज्ञानामध्ये प्रगती व्हावी यासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. तसेच त्यांच्या उद्योग, अर्थ, सहकार, साहित्य व कृषी क्षेत्रामधील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ या नवीन वनस्पतीला ‘कॅपिलिपेडीयम यशवंतराव’ असे नाव देण्यात आले आहे.
मध्यप्रदेश मध्ये मैकल डोंगररांगेतील अन्नुपूर जिल्ह्यामधील प्रसिद्ध अमरकंटक येथे या प्रकल्पाअंतर्गत संशोधन करत असताना ही वनस्पती २०१९ मध्ये प्रकल्प प्रमुख डॉ. पोतदार व डीएसटी प्रोजेक्ट फेलो तरबेज शेख या संशोधकांनी शोधली. त्यावर संशोधन केल्यानंतर जगातील कोणत्याही ठिकाणी असे साध्यर्म असलेली वनस्पती अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे नवीन ''कॅपिलिपेडीयम यशवंतराव'' या वनस्पतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. हि वनस्पती गवत या कुळातील असून याचा पुष्पसंभार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान या वनस्पतीला फुले येतात. हि वनस्पती साधारणपणे समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचीवर वाढते. जागतिक स्तरावर याआधी कॅपिलीपेडीयम या गवताच्या एकूण १८ प्रजाती नोंद केल्या आहेत, त्यापैकी भारतात एकूण ८ प्रजातींची नोंद आहे. या संशोधनामुळे आता या नवव्या प्रजातीची त्यामध्ये नोंद झाली आहे.
कोट
यशवंतराव चव्हाण सायन्स काॅलेज मध्ये नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचे संशोधन सुरू असते.संस्था व आम्ही सगळे अशा गोष्टीला प्रोत्साहन देत असतो. गवत कुळातील नव्या प्रजातीचे संशोधन आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- प्राचार्य डॉ. बी. एस. केंगार
फोटो
गवत कुळातील नवीन संशोधन झालेली वनस्पती