प्रगती जाधव-पाटीलसातारा : तामिळनाडूमधील मधुराई जिल्ह्यातील एका भागामधून भारतीय वन्यजीव संशोधकांनी निम्यास्पिस कुळातील पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. नारंगी, पिवळा, पांढरा आणि काळ्या रंगाची नक्षी शरीरावर असून, तिच्या पाठीवर पांढऱ्या रंगाने जाळीदार नक्षी बनलेली आहे. पाठीवर असणाऱ्या या जाळीदार नक्षीमुळेच या पालीचे नाव ‘निम्यास्पिस रेटॅक्युलेटा’ असे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संशोधनात साताऱ्यातील आयान सय्यद आणि मासूम सय्यद या दोन चिमुकल्या संशोधकांचा समावेश आहे.पालीमधील काही पाली रंगाला साधारण पांढऱ्या किंवा काळपट रंगाच्या असतात. सर्रास पाल म्हटले की तिचा तिरस्कार केला जातो; पण जैवसृष्टीत पालीच्या अस्तित्वालाही महत्त्व आहे. त्यामुळे विविध पातळ्यांवर पालीच्या नवनवीन प्रजातींचा शोध लावला जातो. अनेकांसाठी वर्ज्य असलेली पाल किती देखणी असू शकते ही निसर्गाची कमाल या पालीला पाहिल्यावर येऊ शकते. तामिळनाडू येथे गेली काही वर्षे हे संशोधन सुरू होते. ज्यामध्ये तामिळनाडू व केरळच्या जंगलात जाऊन यांचा अभ्यास करण्यात आला.या पालीच्या अभ्यासात शारीरिक महत्त्वाचे घटक तसेच या कुळातील सर्व पालींचा जनुकीय अभ्यास ही संशोधकांनी केला. या परिश्रमाचे यश म्हणून वन्यजीव संशोधक अमित सय्यद यांची संशोधन पत्रिका आज इंडोनेशियातील ट्याप्रोबोनिका नामक एका नामांकित शास्त्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाली. या संशोधनात डब्लूएलपीआरएसचे अमित सय्यद, शौरी शुलाखे, जयदित्या, शुभकर देशपांडे, सॅमसन, अनबाझगण, संतोष यांच्यासह आयान सय्यद, मासूम सय्यद, राहुल खोत आणि ओमकार अधिकारी यांनी या संशोधनात सहभाग घेतला.
साताऱ्यातील आयान अन मासूमचा सहभागभारतातील वन्यजीव संशोधकांनी या अनोख्या पालीचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे या संशोधनात इतर संशोधकांबरोबर दोन चिमुकले संशोधकही सहभागी झाले आहेत. साताऱ्यातील आयान सय्यद आणि मासूम सय्यद हे दोघे अनुक्रमे सहावी आणि सातवीत शिकत आहेत. अगदी लहान वयापासूनच त्यांना वन्यप्राण्यांची आवड आहे. हे जगातील पहिले लहान संशोधक आहेत ज्यांनी एका नवीन प्राण्याचा शोध लावण्यात आपला सहभाग नोंदवला आहे.