सागर गुजर सातारा : ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत. याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक झाली नाही, तोपर्यंत परिवर्तनाचा जागर करणाऱ्या लोकांना जीव तळहातावर घेऊनच काम करावे लागणार आहे. मात्र, माणूस संपवला तरी विचार संपत नसतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम अत्यंत वेगाने पुढे सुरू आहे,’ असे दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी, पुणे येथे हत्या झाली. त्यांना जाऊन सात वर्षे झाली, तरीदेखील त्या हत्येचे सूत्रधार अजूनही मोकाट फिरत असल्याचे शल्य डॉ. हमीद यांनी व्यक्त केले. संशयित आरोपी म्हणून ‘सीबीआय’ने २०१६ मध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, आॅगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहेत. अमोल काळे या संशयित आरोपींविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्ध देखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. हत्येमागील सूत्रधार कोण आहेत. हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे, असे मुलगी मुक्ता आणि डॉ. हमीद यांनी सांगितले. डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे व विवेकी समाजनिर्मितीचे काम जोमाने सुरू आहे.>राज्यव्यापी अभियानलातूर : अंनिसने २० आॅगस्टपासून ‘सुत्रधार कौन?’ हे राज्यव्यापी अभियान हाती घेतले आहे़ डॉ़ दाभोळकर यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने व गतीने व्हावा, असा अंनिसचा आग्रह आहे़ यावर्षी ‘सुत्रधार कौन?’ हे अभियान राबविले जात आहे, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.
माणूस संपवला तरी विवेकवाद वाढतोच आहे- डॉ. हमीद दाभोलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 4:05 AM