सातारा : पालिकेत दहा वर्षे एकत्रित सत्तेत असणाऱ्या सातारा विकास व नगरविकास या दोन्ही आघाड्यांनी सवता सुभा थाटण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती बुधवारी पुढे आली आहे. मनोमिलनातील या दोन्ही आघाड्या मैत्रिपूर्ण लढतीसाठी तयार झाल्या आहेत. याबाबत दोन्ही आघाड्यांतून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी सातारा विकास आघाडीतर्फे गुरुवारी (दि. २७) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नगरविकास आघाडी यांच्यातील मनोमिलन टिकावे, यासाठी अदालत वाड्यातही बैठक झाली. घराण्यातील ज्येष्ठ व माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले व चंद्रलेखाराजे भोसले यांनी मनोमिलन टिकावे, यासाठी प्रयत्न केले; परंतु दोन्ही आघाड्यांतून स्वतंत्र लढण्याबाबत आग्रह होऊ लागला आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. तसेच काही मातब्बर नगरसेवकांच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर दोन्ही आघाड्यांच्या स्वतंत्र बैठका सुरू झाल्या आहेत. दोन्ही राजेंमध्ये भावनिक बंध घट्ट असले तरी त्यांचे कार्यकर्ते भलतेच इर्ष्येला पेटले आहेत. अनेकांच्या महत्त्वाकांक्षा दुणावल्या आहेत. आपल्या उमेदवारीसाठी अनेकांनी दबावगट तयार केला आहे. अनेक प्रभागांतून नगरविकास आघाडीच्या उमेदवारापुढे सातारा विकास आघाडीचे उमेदवार एकमेकांपुढे दंड थोपटत आहेत. कुणाला नाराज करायचे नाही, ज्याला लढायचे आहे, त्याला लढू द्यायचे, असे धोरण दोन्ही राजेंकडून ठरविल्याचे आता समोर येत आहे. मनोमिलनाबाबत आता चर्चाच नको, असाही होरा दोन्ही आघाड्यांतून पुढे येत असल्याने दोन्ही आघाड्यांनी मैत्रिपूर्ण लढती करण्यावर भर दिल्याचे समोर येत आहे. दोन्ही आघाड्यांकडून ४० -४० उमेदवारांच्या याद्या तयार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने यापूर्वीच दिले होते. या उमेदवारांनी प्रभागात प्रचार फेऱ्याही सुरू केल्या आहेत. विद्यमान नगरसेवकांमधून प्रभागात केलेल्या कामांची जंत्री जनतेसमोर मांडली जात आहे. तर विरोधकांकडून त्यांच्या उणिवा मांडल्या जात आहेत. दोन्ही आघाड्यांतील कट्टर विरोधक जसे एकमेकांविरोधात भिडले आहेत, त्याचप्रमाणे आघाड्यांअंतर्गत उमेदवारही इर्ष्येला पेटले आहेत. सातारा विकास आघाडीतर्फे गुरुवारी अर्ज भरले जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्या वतीने गुरुवारी रॅली काढून अर्ज भरण्यात येणार असून, त्यांनी निवडणूक विभागाकडून बुधवारी रीतसर परवानगीही घेतली आहे. शुक्रवारी नगरविकास आघाडीकडून अर्ज दाखल होणार असल्याचीही माहिती पुढे येत आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. काँगे्रसच्या वतीने जवळपास १० उमेदवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भाजपने ४० जागा लढण्याचा निर्णय घेतल्याचेही समोर येत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)खासदारांची पोवई नाक्यावरील हॉटेलवर चर्चा !खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी पोवई नाक्यावरील एका हॉटेलमध्ये दिवसभर निवडक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. माजी नगराध्यक्ष नासीर शेख यांच्या कार्यकर्त्यांनी या आधीच उदयनराजेंची भेट घेऊन त्यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. बुधवारीही नासीर शेख यांनी उदयनराजेंची भेट घेतली. प्रभागातील परिस्थितीसह शहरातील एकूणच वातावरणाची हाल हवा त्यांनी जाणून घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर शेख कार्यकर्त्यांसह प्रभागात निघून गेले.उदयनराजे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी माधवी कदमनगराध्यक्षपदासाठी नगर विकास आघाडीकडून कर्तव्य सोशल गु्रपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सातारा विकास आघाडीतून माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, दिनाज शेख यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत होती. परंतु बुधवारी अचानक डॉ. संजोग कदम यांच्या पत्नी माधवी कदम यांचे नाव पुढे आले. यादोगोपाळ पेठेतील रहिवासी असणाऱ्या कदम यांना ‘साविआ’कडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अविनाश कदम विरुद्ध वसंत लेवेप्रभाग क्रमांक १८ मधून नगरविकास आघाडीतून अविनाश कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, त्यांना आव्हान देत नगरविकास आघाडीचे माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सातारा विकास आघाडीतून वसंत लेवे यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भारतीय जनता पार्टीकडून सतीश ऊर्फ पप्पू लेवे यांना संधी दिली जाणार आहे. या उमेदवारांमुळे प्रभाग १८ मध्ये जोरदार लढत होणार आहे.
चर्चा मनोमिलनाची.. कृती आमने-सामनेची!
By admin | Published: October 26, 2016 11:08 PM