कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार त्याचे चित्र अद्यापही अस्पष्ट आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्याविरोधातील डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी याबाबत कराडला सुरू झालेली बैठक गुरुवारी पहाटे तीन वाजता संपली. गुरुवारी सायंकाळी पुन्हा त्यासाठीच बैठक सुरू झाली. त्यामुळे मनोमिलनाच्या चर्चेचे गुऱ्हाळ संपता संपेना असेच चित्र दिसत आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जूनला होत आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून १ जूनपर्यंत त्याची मुदत आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलने त्याची जोरदार तयारी केली आहे. पहिल्या दिवशीच पहिला उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी तयारी दाखवूनही दिली आहे. मात्र, दुसरीकडे त्यांचे विरोधक असणारे डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते हे दोघेही मनोमिलनाची चर्चा करण्यात गुंतल्याचे पाहायला मिळत आहे.
सत्ताधारी सहकार पॅनेलच्या डॉ. सुरेश भोसले यांना रोखण्यासाठी विरोधी डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते यांनी एकत्र आले पाहिजे, अशा भावना सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी काही महिन्यांपूर्वीच व्यक्त केल्या आहेत. त्यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेत मुंबई कराडात मनोमिलनासाठी बैठकाही घडवून आणल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत.
बुधवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात या मनोमिलनासाठीच एक बैठक सुरू झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे युवा नेते ॲड. उदयसिंह पाटील यांच्यासह डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते व त्यांचे प्रमुख कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. सुरुवातीला वरिष्ठ नेत्यांनी इंद्रजित मोहिते अविनाश मोहिते यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर या दोघांना त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह समोरासमोर घेऊन चर्चा केली. ही चर्चा गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत चालली. पण चर्चेतून समाधानकारक मार्ग मात्र निघाला नसल्याचे खात्रीशीर समजते.
त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पुन्हा कराडच्या शासकीय विश्रामगृहात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले. पुन्हा तेच नेते, तेच कार्यकर्ते आणि तीच चर्चा सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरूच होती. आता या चर्चेचे गुऱ्हाळ कधी संपणार हे चर्चा करणाऱ्यांनाच माहीत.
चौकट
बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत ८-८-५ या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे समजते. डॉ. इंद्रजित मोहिते यांना आठ उमेदवार, अविनाश मोहिते यांना आठ उमेदवार तर पृथ्वीराज चव्हाण, मंत्री कदम, उदयसिंह पाटील यांनी पाच उमेदवार निश्चित करावे, असा तो फाॅर्म्युला होता म्हणे. मात्र, ही चर्चा सर्वांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे योग्य मार्ग निघाला नसल्याचे समजते.
चौकट
ऑम्लेटवर मारला ताव...
बुधवारी सायंकाळी सुरू झालेली बैठक रात्री उशिरापर्यंत लांबत गेली तेव्हा अनेकांच्या पोटात भुकेची चाहूल लागली मग मंत्री कदम यांनी ऑम्लेट खाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा बाहेरून अंडी मागवून ऑम्लेट तयार करण्यात आले. मग चर्चा करत करतच ऑम्लेटचा आस्वाद नेत्यांनी घेतला.
फोटो
कराड येथे गुरुवारी शासकीय विश्रामगृहात मंत्री विश्वजित कदम बैठकीसाठी आले होते. त्यावेळी ॲड. उदय पाटील व इतर.