दीपक शिंदे
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचीनिवडणूक मोठ्या अटीतटीची झाली. ११ जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी १० जागांवर राजकारणाचा कस लागला. काहींनी निवडणुकीत बाजी लावली तर काहींनी ती सहजही घेतली. त्याचे परिणाम व्हायचे ते झाले. पण, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केवळ निवडणूकच नाही तर बँक आपल्याच ताब्यात ठेवण्याचे नियोजन बँकेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच केले होते. त्यामुळे त्यांच्याशिवाय किंवा त्यांच्या मर्जीशिवाय बँकेच्या अध्यक्षपदासाठी सध्या तरी इतर कोणाचा विचार करणे शक्य होणार नाही. बँकेच्या राजकारणावर त्यांची असलेली मजबूत पकड इतरांना शांत करण्यास पुरेशी आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी यावर शिक्कामोर्तबच करून घेतले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यात आघाडीवर नाव होते ते आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचे. मकरंद पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील जागा बिनविरोध करून मतदारसंघावरील आपली पकड सिद्ध केली होती. नितीन पाटील यांनीही अध्यक्षपदाच्या शर्यतीत जोरदार दौड लगावली होती. त्यामुळे त्यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मात्र पुन्हा अध्यक्ष होण्याबाबत काहीच चर्चा केली नव्हती. त्यांनी आपले पत्ते ओपन करण्यास योग्य वेळेची वाट पाहिली. तसे टायमिंग साधण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. एवढे दिवस घड्याळ्याच्या संपर्कात असल्यामुळे परफेक्ट टाइम आणि करेक्ट कार्यक्रम हे त्यांचे नियोजन ठरलेले असते. त्यानुसार दोन दिवसांवर अध्यक्षपदाची निवडणूक आलेली असताना त्यांनी पुन्हा एकदा अध्यक्ष होऊन जिल्हा बँकेचा कारभार सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या जिल्हा बँकेतील त्यांची ताकद वाढलेली असल्यामुळे इतरांनाही त्यांना वगळून आणि त्यांच्याशिवाय बँकेचे राजकारण करता येणार नाही. त्यामुळे सध्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर त्यांची निवड होणे ही फार अवघड गोष्ट राहिलेली नाही. त्यांच्या अध्यक्षपदासाठी विरोधापेक्षा अनेकांची सहमतीच मिळण्याचीच शक्यता अधिक आहे.
शिवेंद्रसिंहराजेंंना कोणाकोणाचा मिळू शकतो पाठिंबा
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षपदासाठी रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, शिवरूपराजे खर्डेकर, सत्यजित पाटणकर, ज्ञानदेव रांजणे, कांचन साळुंखे, अनिल देसाई, शेखर गोरे, सुनील खत्री, प्रभाकर घार्गे, सुरेश सावंत आणि स्वत: शिवेंद्रसिंहराजे भोसले असे १२ संख्याबळ होत असल्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंशिवाय इतर पर्यायाचा विचार होणे शक्य दिसत नाही.
बँकेत हवे सर्वसमावेशक नेतृत्व
जिल्हा बँकेत राजकारण केले जात नाही. तर त्याचा सोयीने वापर केला जातो. त्यामुळे राजकारणाशिवाय सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले हा चांगला पर्याय सर्वांसमोर आहे. सर्वांशी चांगले संबंध आणि सर्वांचे मत विचारात घेऊन पुढे जाण्याची पद्धत यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा दिली जाण्याची शक्यताच अधिक आहे.