दत्ता यादव -- सातारा -आजकाल सर्वांच्याच हातात अॅण्ड्रॉइड मोबाईल आले आहेत. घराबाहेर पडल्यानंतर जाता-जाता एखाद्या अपघात झाल्यास हल्ली मदत करण्याऐवजी हातातील मोबाईलच पुढे सरसावतात. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अपघातांची मालिकाच झाली. ज्या ठिकाणी हे अपघात झाले. त्याच क्षणी त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईलवर छिन्नविच्छिन्न मृतदेहांचे फोटो काढून व्हाट्सअॅपवर फॉरवर्डही केले.पाहता-पाहता अपघाताचे फोटो अन्य ग्रुपवरही दिसू लागले. छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह अन् अपघातातील वाहनांचा झालेला चक्काचूर, अशा भयानक आणि अंगावर शहारे आणणारे फोटो या आठवड्यात व्हाट्सअॅपच्या अनेक ग्रुपवर पाहायला मिळाले.अपघातातील जखमींना श्रद्धांजली वाहण्यापेक्षा स्पॉटचे जसेच तसे फोटो पाठविण्यात या आठवड्यात सोशल मीडियावर चढाओढ दिसून आली. पॅरीसमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी भारतीय मीडियावर सोशल मीडियाने तोंडसुख घेतले होते. कारण रक्तरंजित फोटो घेणे वर्तमानपत्रामध्ये पॅरीसच्या मीडियाने कसे टाळले. याचे धडे दिले गेले; मात्र हाच सोशलमीडिया आता जिल्ह्यात झालेल्या अपघातांतील छिन्नविच्छिन्न मृतदेहांचे फोटो सेंड करून पॅरीस हल्ल्यातील दिलेले उपदेश विसरूनही गेला.पंजाब येथील पठाणकोट येथे झालेला दहशतवादी हल्ला अन् या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या अनेक ग्रुपवर पोस्ट झळकून गेल्या. हुतात्मा झालेल्या जवानांची कारर्कीद आणि लेखाच्या शेवटी त्यांना ‘शहिदोंको सलाम’ असे लाल अक्षरामध्ये लिहून त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे पाहायला मिळाले.सत्तेतील सरकार कोणाचेही असले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. याचे ज्वलंत उदाहरण देताना सोशल मीडियावर आत्महत्या करणाऱ्या बळीराजाची मृत्युपूर्व कविता डोळ्यांत पाणी आणायला लावते. तर दुसरीकडे कोल्हापूर आणि पंढरपूर येथे झालेल्या आॅनरकिलिंगवरही चर्चा अन् निषेध नोंदविले गेले. सोशल मीडियावरील लोक जागृत असले तरी उत्साहाला लगाम स्वत:पासून घालणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. चित्रकारांनाही दाद !सोशल मीडियावर सर्वच वाईट पोस्ट टाकल्या जातात, असेही नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे सुबक चित्र रेखाटणाऱ्या चित्रकाराला प्रोत्साहन आणि दाद देऊन त्यांच्या चित्राचे कौतुक करणारेही याच मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात.
मोबाईलच्या स्क्रीनवर छिन्नविच्छिन्न मृतदेहांचे विदारक चित्र !
By admin | Published: January 08, 2016 11:35 PM