कऱ्हाड : शहरातील जी महत्त्वाची ठिकाणे आहेत त्यामध्ये दत्त चौकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कित्येक दशकांतील बदलते कऱ्हाड या चौकाने अनुभवले आहे. अनेक घटनांचा हा चौक साक्षीदार आहे. मात्र, सध्या ‘हार्ट ऑफ सिटी’ असलेल्या या चौकाचे विद्रुपीकरण होत आहे. विक्रेत्यांचा येथे गराडा पडलाय. अतिक्रमण करणाऱ्यांनी तर चौक पूर्णपणे ओंगळवाणा केलाय. मात्र, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही, हे दुर्दैव.
कऱ्हाडचा दत्त चौक म्हणजे शहराचे मध्यवर्ती ठिकाण. सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक तसेच राजकीय घटना, घडामोडींचा हा केंद्रबिंदू. अनेक वर्षांपासून हा चौक अस्तित्वात आहे. आणि शहरातील अनेक घडामोडींचा तो साक्षीदारही आहे. सातारा, कोल्हापूरहून कऱ्हाडात आल्यानंतर शाहू चौक ओलांडताच या चौकात प्रवेश होतो. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि विस्तीर्ण चौक प्रत्येकाला आकर्षित करतो. याच चौकात शिवरायांच्या पुतळ्यासमोर प्रत्येक जण नतमस्तक होऊनच पुढे मार्गक्रमण करतो. मात्र, गत काही महिन्यांपासून हा चौक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. चौकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांनी पथारी पसरली आहे.
कुणीही यावे आणि चौकात दुकान मांडावे, अशी येथील परिस्थिती आहे. प्रत्येक प्रकारचे किरकोळ विक्रेते या ठिकाणी रस्त्याकडेलाच आपला बाजार मांडताहेत. वाहनांचे पार्किंगही होतेय. तसेच खरेदीदारांची झुंबड उडाल्यानंतर चौकातील वाहतुकीचा श्वास कोंडतो. मात्र, या परिस्थितीकडे पालिकेसह वाहतूक पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठीही येथे रस्ता शिल्लक नाही. मात्र, तरीही या विक्रेत्यांना कोणी अटकाव करीत नाही. त्यामुळेच हार्ट ऑफ सिटी कसलेला हा चौक सध्या बकाल बनल्याचे दिसून येत आहे.
चौकात काय आहे?
- छत्रपती शिवरायांचा पुतळा
- मुख्य बाजारपेठेचा मार्ग
- हाकेच्या अंतरावर बसस्थानक
- नजीकच प्रशासकीय इमारत
- काही अंतरावरच पंचायत समिती
- वीज वितरणचे मुख्य कार्यालय
- विविध बँकांच्या मध्यवर्ती शाखा
...म्हणून म्हणतात दत्त चौक!
गोविंद हरी पुरोहित यांनी १९२७ साली या चौकात दत्ताचे मंदिर उभारले. तेव्हापासून या चौकाला ‘दत्त चौक’ अशी ओळख मिळाली. त्यानंतर ३१ मे १९९६ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे या चौकात अनावरण करण्यात आले.
फिरते विक्रेते चौकातच थांबतात
फिरते विक्रेते दत्त चौकात थांबून व्यवसाय करतात. चारचाकी हातगाडा रस्त्याकडेला उभा करून बिनधास्तपणे त्यांची विक्री सुरू असते. त्यामध्ये फळ विक्रेत्यांचे प्रमाण जास्त आहे. तर काही वेळा लसूण, कांदा यासह अन्य भाजीपाला विकणारेही येथे व्यवसाय करताना दिसतात.
अंथरूण विक्रेत्यांनी पाय पसरले!
दत्त चौक हे शहरातील महत्त्वाचे ठिकाण. मात्र, या चौकात अनेकांनी पाय पसरले आहेत. अंथरुण विक्रेतेही गत काही महिन्यांपासून येथे दाखल झाले असून रजई, चादर, ब्लँकेट यासह अन्य वस्तू रस्त्यावर मांडून त्यांचा व्यवसाय सुरू असतो. त्यांचा हा पसारा चौकाच्या विद्रुपीकरणात आणखी भर घालतो.
कुणीही यावे, बेशिस्तीने वागावे..!
- विक्रेत्यांचे उभे असलेले हातगाडे
- चारचाकी वाहनांचे पार्किंग
- माल वाहतूक वाहनांचा थांबा
- लटकणारे जाहिरात फलक
- किरकोळ विक्रेत्यांचे बस्तान
- पुतळ्यामागे उभी राहणारी वाहने
- तिन्ही बाजूला दुचाकींचे पार्किंग
- आयलॅण्डमध्ये साचणारा कचरा
- वाढलेले गवत आणि झुडुपे