सातारा : फुटका तलाव आणि मोती तळ्यात विसर्जनास पालिकेने यापूर्वीच बंदी घातली असून, आता मंगळवार तळ्यातही विसर्जन करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गणेशोत्सव बैठकीत जाहीर करण्यात आले. तसेच डॉल्बीबंदीसाठी प्रशासनाला साथ देण्याचे वचन देत कार्यकर्त्यांनी यंदा डॉल्बीबंदी झालीच पाहिजे, असा आग्रह धरला.येथील जिल्हाअधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शांतता कमिटी, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी जिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपविभागीय अधिकारी संजय राऊत, मुख्याधिकारी अभिजित बापट, डॉ. हमीद दाभोलकर आदी उपस्थित होते.बैठकीच्या प्रारंभी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, गणेशोत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे. गणेशमंडळांनी वर्गणी मागताना धर्माधाय आयुक्तांची नोंदणी करणे आवश्यक आहे. वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती करू नये, मंडळांसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एकच ठिकाणी मिळण्याची सोय करण्यात आली आहे. गणेश मंडपाजवळ मंडळांनी स्वयंसेवक नेमावेत. मिरवणुकीमध्ये ५५ डेसीबलपेक्षा जास्त ध्ननीप्रदूषण झाल्यास संबंधित मंडळावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, सातारा जिल्हा हा पुरोगामी परंपरा जपणारा जिल्हा आहे. गणेश उत्सवावर दहशतवादी व दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे आपण जबाबदारीने हा उत्सव साजरा करावा. विसर्जनाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमाचे सर्वांनी पालन करावे. गेल्या वर्षी चार कृत्रिम तळी तयार करण्यात आली होती. परंतू यंदा सहा कृत्रिम तळी तयार करण्यात आली आहेत. हॉस्पीटलचा परिसर हा सायलंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. रस्त्यांमध्ये मंडप उभारू नयेत. वीज कनेक्शन अधिकृत घ्यावीत. सोशल मीडियावर कोणी अफवा पसरवू नये. आक्षपार्ह मजकूर फॉरवर्ड केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.मुदगल पुढे म्हणाले, देशापुढे सध्या कोणत्या समस्या आहेत. यासंदर्भातले देखावे असावेत. जातीय तेड निर्माण होणार नाहीत, अशा प्रकारच्या देखाव्यांना परवानगी दिली जाणार नाही. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, प्रशासनाने केवळ डॉल्बीबंदीचा आदेश देऊन उपयोग नाही तर प्रशासनाने डॉल्बीबंदीसाठी ठोस पावले उचलावीत. कल्पनाराजे भोसले यांनी मंगळवार तळ्यात यंदा विसर्जन करता येणार नाही, असे मला या बैठकीत जाहीर करण्यास सांगितले आहे. यावेळी नगरसेवक जयेंद्र चव्हाण, डॉ. हमीद दाभोलकर, पोलीस मित्र मधूकर शेंबडे यांच्यासह विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. (प्रतिनिधी)तर ध्वनी प्रदुषणाबाबत कारवाईगणेशोत्सव बैठकीत डॉल्बीबंदीबाबत प्रशासन ठोस भूमिका घेईल, असे उपस्थित सर्वांनाच वाटले होते. मात्र ५५ डेसीबलपेक्षा जास्त ध्वनीप्रदूषण झाल्यास वाद्य वाजविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा केवळ इशारा देण्यात आला. मात्र रस्त्यावर डॉल्बी दिसता कामा नये, अशा सक्त सूचना प्रशासनाकडून या बैठकीत देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे डॉल्बीबंदीबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही संभ्रमावस्था आहे.
मंगळवार तळ्यातही विसर्जनबंदी
By admin | Published: September 08, 2015 9:47 PM