सातारा : सातारा हिल मॅरेथॉनमध्ये रविवारी देश-विदेशातील पाच हजार धावपटू दौडले अन् एक जागतिक विक्रम प्रस्थापित झाला. यवतेश्वरच्या घाटातून निसर्गाच्या संगतीनं धावणाऱ्या हजारो स्पर्धकांनी अन् त्यांना प्रोत्साहन देण्याऱ्या नागरिकांनी अवघा घाट परिसर फुलून गेला होता. स्पर्धा संपली; पण घाट परिसरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा तसाच राहिला होता. सोमवारी विद्यार्थ्यांनी श्रमदान करून ३६ पोती कचरा गोळा केला अन् घाट परिसर चकाचक झाला.सातारा येथील ढाणे क्लासेसच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठीही योगदान दिले. रविवारी साताऱ्यात भारतासह विविध देशांतील धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी हजेरी लावली होती. स्पर्धेदरम्यान ठिकठिकाणी स्पर्धकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले जात होते. तसेच प्लास्टिकच्या ग्लासमधून फळांचा रसही दिला जात होता. धावता-धावता स्पर्धक पाणी, रस पिऊन, रिकाम्या बाटल्या, ग्लास रस्त्याकडेलाच फेकून देत होते. त्याचप्रमाणे स्पर्धकांचा उत्साह वाढावा, रस्त्याच्या दुतर्फा सातारकरांनी मोठी गर्दी केली होती. यवेतश्वर घाटातही नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांनी टाकलेली रिकामी खाऊची पाकिटे, प्लास्टिकच्या पिशव्या असा ३६ पिशव्या कचरा विद्यार्थ्यांनी घाटातील स्पर्धेच्या मार्गावर गोळा केला व त्याची विल्हेवाट लावली. मॅरेथॉन असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनी स्पर्धेवेळी पिशव्यांमधून कचरा गोळा होता. पण इतरत्र विखुरलेला सर्व कचरा उचलून विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला. (प्रतिनिधी)
मॅरेथॉनच्या मार्गातील ३ टन कचऱ्याची विल्हेवाट
By admin | Published: September 08, 2015 9:56 PM