औंध : औंध परिसरातील २५ गावांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडले. यावेळी सरासरी ८३ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती झाल्याने सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पारगाव येथे मतदानावरून दोन गटांत वादावादी झाली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत औंध पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
औंध पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पुसेसावळी, वडगाव जयराम स्वामी, चौराडे, रहाटणी, रेवली, कळंबी, वडी, नांदोशी, खबालवाडी, जायगाव, भोसरे, लोणी, वरूड, गोपूज, गोसाव्याचीवाडी, येळीव, करांडेवाडी, उंचीठाणे, खरशिंगे, पळशी, कोकराळे, नागाचे कुमठे, गोरेगाव वांगी, पारगाव आदी २५ गावांमध्ये मतदान पार पडले. सर्वच ठिकाणी अतिशय चुरशीने मतदान झाले असून सुमारे ८३ टक्के मतदान झाले.
उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख औंधसह परिसरात मतदान केंद्रांना भेटी देण्याच्या निमित्ताने जात असताना गोपूज गावातील चौकात जमाव दिसला. गाडी आत घेताच कार्यकर्त्यांनी धूम ठोकली.