पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावरील नैसर्गिक, रंगीबेरंगी रानफुले बहरत असून, अनेकविध दुर्मीळ रंगीबेरंगी रानफुलांचे दर्शन होऊ लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पठारावर पाऊस व धुके मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळत आहे.
विघ्नहर्ता (विघ्ना विक्झिलेटा )
सह्याद्रीच्या व सातपुडा रांगेतही वेलवर्गीय वनस्पती पाहावयास मिळते. तीन पानांच्या पाकळीची ही वेल इतर वनस्पतींच्या आधाराने वाढते. पानांच्या खाचीतून बाहेर आलेले त्याचे फूल गणपतीच्या सोंडेसारखे दिसते. यावरून यास विघ्नहर्ता तसेच हत्तीची सोंड म्हणतात. याच्या मुळाशी लांब आकाराचा गोड चवीचा कंद असतो. सप्टेंबर महिन्यात यास लांबट स्वरूपाची शेंग येते. त्याच्या आतील दाणे गोड, तुरट असतात. याकडे पक्षी, कीटक आकर्षित होतात.
जरतारी (प्फ्लेमेंजिया )
ही वेलवर्गीय वनस्पती आहे. लालसर रंगांचे फूल असते. फुले, पानावर तूस असतात. रताळ्यासारखा कंद जमिनीत असतो. ‘फ्लेमेंजिया’ असे या फुलाचे शास्त्रीय नाव आहे. तसेच हिलुरी असे ग्रामीण भागात म्हणतात. या फुलाची छबी कैद करण्याचा मोह आवरत नाही.
नीलिमा(मुरडानिया सिमप्लॅक्स )
गवतवर्गीय वनस्पती असून, त्याला तीन पाकळ्या असतात. लोकांना, फूलपाखरांना, कीटकांना आकर्षित करतात. याला ‘मुरडानिया सिमप्लॅक्स’ असे शास्त्रीय नाव आहे. एकूण चार प्रकार असून, दुपारी फूल उमलते.
निसुरडी( परकारऑफीस )
निळी व पांढरी निसुरडी असे दोन प्रकार असून, पांढऱ्या निसुरडीचे पान हत्तीच्या कानासारखे असते. त्यातून कोंब येतो. देठ पोकळ असतो. त्याला दोन दिवसाला फुले येतात. त्यानंतर बी वाळल्यानंतर त्याचे काटे माणूस, जनावरांच्या अंगाला चिटकून परागीभवन होते.
रानवांगे
याला चिचुरटी असेही म्हणतात. सोलॅनम इंडिकम असे शास्त्रीय नाव असून, औषधी वनस्पती आहे. सप्टेंबर महिन्याच्या आसपास पाहावयास मिळते.
कोट
कास परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस व धुके पडत आहे. इथून पुढे ऊन पडल्यानंतर चांगल्या प्रकारची फुले पाहावयास मिळतील. ऊन, पाऊस असे वातावरण राहिल्यास लवकरच गालिचे दिसू लागतील.
-श्रीरंग शिंदे, माजी वनपाल (कास पठार )