लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : सत्तरीकडे झुकलेल्या आजीबाई गावात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. कधी हाताला काम नसलं, तर आजीबाई कुणाचा तरी दरवाजा ठोठावून आपली भूक भागवत होत्या. त्यादिवशीही असेच झाले. भुकेने व्याकूळ झाल्या म्हणून त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका घराजवळ जाऊन त्यांनी दरवाजा ठोठावला. अन् इथंच आजीचा घात झाला. आजीने दरवाजा ठोठावल्याने कीर्तनकाराची प्रणयक्रीडा भंग पावली. त्यामुळे कीर्तनकाराने निर्दयपणे आजीचा जीव घेतला. या धक्कादायक घटनेचा उलगडा वडूज पोलिसांनी केला असून, यामुळे समाजमन हेलावून गेले आहे.
हिराबाई दगडू जगताप (वय ७०) यांचे मूळ गाव खटाव तालुक्यातील ऐनकूळ; पण त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या येलमरवाडीमध्ये वास्तव्यास आल्या. त्या साफसफाई करू लागल्यामुळे एका व्यक्तीने आजीला छोटेसे घर राहायला दिओ. शेजाऱ्या- पाजाऱ्यांची छोटी-मोठी कामे करून त्या आपल्या दोनवेळच्या अन्नाची व्यवस्था करत होत्या. गावात त्यांचा कोणालाच त्रास नसायचा. दादा, ताई, माई म्हणत त्या एक एक दिवस आयुष्य पुढे ढकलत होत्या. पण रविवारची रात्र त्यांची अखेरची ठरली. गावातीलच बाळकृष्ण पोळ यांच्या घरासमोर त्या मृतावस्थेत गावकऱ्यांना दिसल्या. पोलिसांनी जेव्हा त्यांचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांच्या डोक्यात खोलवर वार झालेले दिसले. कोणीतरी त्यांचा खून केला, हे निश्चित झाले. पोलिसांचा तपासही लगेच सुरू झाला. न विचारता मध्ये-मध्ये बोलणारा बोलघेवडा कीर्तनकार पोलिसांना खटकला अन् इथच त्याच्यावर दाट संशय बळावला. पोलिसांच्या स्टाईलने त्याला पोलिसांनी क्षणातच बोलते केले. तेव्हा त्याच्या कबुली जबाबाने पोलीसही अवाक् तर झालेच शिवाय त्यांचे मनही हेलावून गेले.
चाैकट : तपासात काय समोर आले..
तुळशीराम सखाराम बागल (वय ४९, रा. येलमरवाडी, ता. खटाव) हा तसे पाहिले तर कीर्तनकार; पण कीर्तन सांगत सांगत तो एका महिलेच्या प्रेमात पडला. रविवार, दि. १२ रोजी रात्री आठ वाजता कीर्तनकार तुळशीराम हा एका महिलेच्या घरात गेला. संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती घरात एकटीच होती. दोघेही प्रणयक्रीडेत मग्न असतानाच दरवाजावर थाप पडली. कीर्तनकारच्या हृदयात धस्स झाले. त्याने दरवाजा उघडला तर बाहेर सत्तर वर्षांच्या आजी हिराबाई दिसल्या. रागाच्या भरातच आजीला त्याने घरात ओढून काठीने डोक्यात वार केले. त्यामुळे क्षणातच आजी रक्तबंबाळ होऊन निपचित पडली. भेदरलेल्या कीर्तनकाराने आजीचा मृतदेह उचलून एका घरासमोर ठेवला अन् आपण नामानिराळे आहोत, हे दाखवू लागला.
चाैकट : तिने म्हणे,रक्त पुसले..
संबंधित महिलेच्या घरातच हा क्रूर डाव साधला गेला. आजीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात घरात रक्त सांडले होते. हे रक्त कोणाला दिसू नये म्हणून त्या महिलेने रक्ताचे डाग धुऊन टाकले. हे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेलाही कीर्तनकारासोबत अटक केली आहे. दोघेही सध्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत.