सातारा : माढा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अजूनही महायुतीतील रामराजेंची भाजप खासदारांबाबतची नाराजी दूर झालेली नाही. त्यामुळे रणजितसिंह यांच्यासह अन्य नेत्यांनी नागपूर गाठून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता महायुतीतील वरिष्ठांनाच तोडगा काढावा लागणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार उभा करणार हे स्पष्ट होते. त्यातच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच ही उमेदवारी मिळणार हे दोन महिन्यांपूर्वीच समोर आलेले. त्यामुळे महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याला विरोध केला होता, तसेच निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच फलटणला मेळावा घेऊन रणजितसिंह यांना उमेदवारी मिळू देणार नसल्याचे आव्हान दिलेले. पण, भाजपने याकडे डोळेझाक करत पुन्हा खासदार रणजितसिंह यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे रामराजेंनी जोरदार उठाव करत अकलूजचे मोहिते-पाटील यांनाही बरोबर घेतले. त्यामुळे मागील तीन आठवडे माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
रामराजे यांच्याप्रमाणेच मोहिते-पाटील यांचाही खासदारांना विरोध आहे. भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक राहिलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांनाही पक्षाकडून उमेदवारी हवी होती. पण, ती न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पर्याय त्यांनी स्वीकारला आहे. दोन दिवसांतच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊन उमेदवारीही मिळेल. त्यामुळे मोहिते हे भाजपच्या विरोधात गेल्याने निवडणूक अटीतटीची होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यातच अजित पवार गटाचे रामराजे यांचाही अजून खासदारांना असलेला विरोध मावळलेला नाही. त्यामुळे खासदार रणजितसिंह, आमदार जयकुमार गोरे आणि राहुल कूल यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत वस्तुस्थिती कथन केली, तसेच मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळला जात नाही. निवडणुकीला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणींविषयीही चर्चा केली, अशी माहितीही मिळत आहे. नागपुरातील या भेटीमुळे माढ्यात महायुतीत सर्व काही सुरळीत आहे, अशी स्थिती नसल्याचेच यावरून समोर येत आहे.
धैर्यशील यांचा राजीनामा; भाजपकडून स्वीकार...
भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करणार आणि त्यांनाच माढ्याची उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर धैर्यशील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा भाजपनेही स्वीकारला आहे. यामुळे धैर्यशील यांचा पुढील मार्ग मोकळा झाला आहे.