सातारा : काेयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असून २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १८९ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर धरणातील साठा ६४ टीएमसी झाला असून पायथा वीजगृहातील विसर्ग १०५० क्यूसेकने वाढणार आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपासून २१०० क्यूसेक विसर्ग होणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील १२ दिवसांपासून संततधार आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरला दररोज १०० ते २०० मिलीमीटरच्या अंतरात पाऊस पडत आहे. तसेच कास, बामणोली, तापोळा येथेही संततधार आहे. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्याचबरोबर धोम, कण्हेर, तारळी, उरमोडी, बलकवडी धरणक्षेत्रातही पावसाचा जोर आहे. त्यामुळे ही धरणे ६० टक्क्यांहून अधिक भरली आहेत.त्यातच तारळी धरणही ८५ टक्के भरलेले असल्याने विसर्ग करावा लागणार आहे. तर बलकवडी धरण भरल्याच जमा असून विसर्ग करण्यात येत आहे. विसर्गाचे हे पाणी धोममध्ये येत आहे. त्यामुळे धोम धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढत चालला आहे. त्यातच पावसाचा जोर कायम राहिल्यास धोममधूनही पाणी सोडल्यास कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.कोयना धरणक्षेत्रात पावसाची संततधार आहे. यामुळे सकाळच्या सुमारास धरणात ३६ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठा ६४.३२ टीएमसी म्हणजे ६१.११ टक्के झालेला आहे. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून सोमवारपासून १०५० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये वाढ करुन गुरुवारी सायंकाळपासून आणखी १०५० क्यूसेक विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून एकूण २१०० क्यूसेक पाणी सोडण्यात येणार असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. या कारणाने धरण व्यवस्थापनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
महाबळेश्वरला ३२५७ मिलीमीटर पाऊस...कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला मागील एक महिन्यापासून पाऊस सुरूच आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ११९ तर नवजा येथे १८९ आणि महाबळेश्वरला १५४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा नवजाला ३४६३ मिलीमीटर पडला. त्याचबरोबर कोयनानगर येथे २४५९ आणि महाबळेश्वरला ३२५७ मिलीमीटर झालेला आहे.