संजय पाटील।कऱ्हाड : वाहतूक नियमाचा भंग केला की यापूर्वी चालकांना फक्त ‘पावती’ फाडावी लागायची. दंड भरला की चालक पुन्हा सुसाट सुटायचे; पण आता केवळ दंड भरून पोलिसांचा ससेमिरा सुटणार नाही. ठराविक पाच नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई करणार. तसेच त्याचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यासाठीही प्रस्ताव पाठविणार आहेत. कऱ्हाडच्या वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
वाहनचालक वाहतूक नियमाचे उल्लंघन करताना आढळल्यास या मोहिमेनुसार त्याच्यावर सुरुवातीला दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच संबंधित चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्याची आणि त्याला करण्यात आलेल्या दंडाच्या पावतीची झेरॉक्स काढून त्याबरोबर संबंधिताचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. परिवहन कार्यालयाला असा प्रस्ताव पाठविल्यानंतर तेथून संबंधिताचा परवाना सुरुवातीला तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे. तसेच संबंधित चालकाने तोच नियमभंग वारंवार केल्यास कायमस्वरुपी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून पाठविला जाणार आहे.आठवड्यात ४३ जणांना दणकाकऱ्हाडच्या वाहतूक शाखेने गत सोमवारपासून (दि. १०) ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांचे विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे. या पथकाकडून शहरासह महामार्गावर कारवाई करण्यात येत असून, गत आठ दिवसांत पोलिसांनी ४३ जणांचा वाहन चालविण्याचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रस्ताव पाठविला आहे.हे नियम मोडल्यास लायसन्स रद्द१. मद्यप्राशन करून वाहन चालविणे२. सिग्नल भंग करणे३. मोबाईलवर बोलत वाहन चालविणे४. माल वाहतूक वाहनातून प्रवासी वाहतूक करणे४. वेगमर्यादेचे उल्लंघन करणे
अपघात टाळण्यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल जंप, ड्रंक अँड ड्राईव्ह, अवैध प्रवासी वाहतूक आणि वेग मर्यादेचे उल्लंघन या बाबी अपघाताला कारणीभूत ठरणाºया आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेतली आहे. अपघातावर नियंत्रण आणणे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.- संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, कऱ्हाड