सातारा : वेळे ता.जावली येथील ७५ पैकी केवळ १२ खातेदारांचे पुनर्वसन झाले आहे. याला ग्रामपंचायतीने विरोध केला असून, जमिनीची वाटणी समान व्हावी, उर्वरित जमीन खंडाळा तालुक्यातील माने कॉलनी, भोळी व धनगरवाडी, खंडाळा येथे देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केवळ १२ खातेधारकांना रायगडमधील पळस्पे, पनवेल येथे जमीन देण्यात येत आहे. यावेळी धमेंद्र जाधव, किसन जाधव, सीताराम जाधव, मारुती पवार, बबन जाधव, तुकाराम जाधव, सरपंच कासाबाई पवार उपस्थित होते.
साचलेल्या डबक्यांमुळे साथरोग
सातारा : अतिवृष्टी, महापूर यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिखल साचून दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी साचून डबकी तयार झाली आहेत. यामुळे डेंग्यूचा धोका वाढला आहे. डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने, तातडीने या परिसराची स्वच्छता करून घ्यावी, असा दिला जात आहे.
डेंग्यूग्रस्त भागाची पाहणी
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसतानाच हिवताप रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहरांमधील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. डेंग्यू व चिकनगुनियासारख्या रोगांनीही डोके व काढले आहे. या पार्श्वभूमीवर हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनी डेंग्यूचे रुग्ण आढळणाऱ्या भागांची पाहणी केली.
महामार्गावरील प्रवास धोक्याचा
सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या वेगाने लाॅकडाऊनच्या वर्षभरात २२ अपघातांत तब्बल ३१ जणांना जीव गमवावा लागला आहे. या प्रमुख महामार्गासहीत अन्य दहा राष्ट्रीय महामार्गावर २०० अपघात झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच महामार्गावरील प्रवास धोक्याचा झाला आहे.
साथरोगांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करा
सातारा : शहरात साथीच्या आजारांमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेऊन उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे. मनोज शेंडे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे.