सातारा : राज्यातील खासगी इंगजी माध्यमाच्या शाळांना, २५ टक्के राखीव जागांची ठरवून दिलेल्या शुल्काची रक्कम आरटीईअंतर्गत त्वरित वितरीत करण्यासंबंधी मंगळवारी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे आग्रही मागणी केली.
निवेदनात नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांमध्ये उद्याच्या भारतीय लोकशाहीची मूल्ये रुजवताना, आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षणक्षेत्राकडे जाते आणि म्हणूनच शिक्षणक्षेत्र हे अतिमहत्त्वाचे क्षेत्र आहे. गेल्या सुमारे दीड वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या संबंधित अनेक विधायक निर्णय घेऊन आपल्या शिक्षण खात्याने निश्चितच
कोरोना लढाईतील वाटा उचलला आहे, त्याबद्दल शिक्षण मंत्रालय कौतुकास पात्र आहे.
तथापि राज्यातील खासगी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी संख्येच्या २५ टक्के संख्या एससी, एसटी, आर्थिकदृष्ट्या
मागासवर्ग इ.साठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला असून, अशा २५ टक्के विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क प्रत्येक शाळेच्या गुणात्मक निकष मूल्यांकनाद्वारे शासन प्रत्येक शाळेला प्रदान करीत असते. आजपर्यंत सन २०१८ पर्यंत असे आरटीईचे शुल्क राज्यशासनाने संबंधित शाळांना प्रदान केलेले आहे. त्यानंतर मात्र आजअखेर जवळजवळ तीन वर्षे असे शुल्क वितरीत करण्यात आलेले नाही.
कोरोनामुळे खासगी इंग्रजी शाळा चालक आणि पालक या दोघांची शिक्षण देणे आणि शिक्षण घेणे याविषयी
परवड सुरु आहे. शाळांनी ५० टक्के फी सवलत दिली पाहिजे, अशी पालकांची मागणी आहे. विविध पालक संघ याबाबत आक्रमक होत आहेत. तर संस्थाचालकांना संस्थेचे कर्ज, गुरूजनांसह अन्य व्यक्तींचे पगार भागवणे हे मूलभूत खर्च टाळता आलेले नाही. त्यामुळे पुन्हा ५० टक्के फी सवलत देणे जिकिरीचे बनले आहे.
या पार्श्वभुमीवर राज्य सरकारकडे प्रलंबीत असलेल्या आरटीई अंतर्गतची देय असलेली थकित रक्कम इंग्रजी
शाळांना वितरीत केल्यास इंग्रजी शाळा तरणार आहेत. संस्थाचालक काही प्रमाणात चालू शैक्षणिक वर्षामध्ये फीमध्ये सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ शकतील, सबब सदरची प्रलंबित रक्कम तातडीने मिळावी, अशी ईसा संघटनेची मागणी आहे.
आपण, एक अभ्यास नेतृत्व म्हणून जनसामान्यांमध्ये परिचित आहात. वस्तुस्थिती तपासून, तातडीने आरटीईची
प्रलंबित रक्कम संबंधित संस्थांना प्रदान करणेबाबत स्वतः लक्ष घालून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी आपणाकडे आग्रही शिफारस आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी समक्ष दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या वेळी रॉबर्ट मोझेस, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, विनीत पाटील आदी व्यक्ती उपस्थित होत्या.