चाफळ : कोरोना संसर्गामुळे बहुतांश छोटे मोठे व्यवसाय ठप्प झाल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा या महामारीच्या परिस्थितीत माणुसकीचा आधार देत चाफळ विभागातील गरजू जीप, रिक्षा, सलून व्यावसायिकांना दिवंगत बाळासाहेब देसाई चॅरिटेबल ट्रस्ट, मरळी कारखाना यांच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप चाफळ येथे करण्यात आले.
कोरोना संकटामुळे राज्यशासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने ग्रामीण भागातील हातावर पोट असणारे जिप, रिक्षा, सलून व्यावसायिक घरीच बसून आहेत. कुटुंबाची दोन वेळची भूक कशी भागवायची, असा आवासून प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे. अशा या महामारीच्या परिस्थितीत या व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना मायेचा माणुसकीचा आधार देत स्वर्गीय बाळासाहेब देसाई चॅरिटेबल ट्रस्ट मरळी कारखाना यांच्यावतीने अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे पाटण तालुकाध्यक्ष भरत साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. वाय. पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम पाटील, शिवदैवलत बँकेंचे संचालक चंद्रकांत पाटील, चाफळ सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पाटील, पुरुषोत्तम पाटील, कैलास गादेकर व व्यावसायिकांची उपस्थिती होती.