बामणोली : बामणोली परिसरातील दुर्गम गावांना कोरोनापासून प्राथमिक उपचार होण्यासाठी रामचंद्र मालुसरे, केळघर सोळशी यांनी स्वखर्चातून मोफत मिनी ऑक्सिजन मशीनचे नुकतेच वाटप करण्यात आले. बामणोली परिसरातील दुर्गम गावातील आजारी रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचण्यास खूप अडीअडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून केळघर सोळशी ग्रामपंचायतीने या मशीन मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
रामचंद्र मालुसरे यांनी या मशीन्स केळघर सोळशी ८०, तेटली २२, आपटी ११, सावरी ६, पाली ५, फुरुस ५, तापोळा ११, म्हावशी ७, उंबरी ३, बामणोली ९, अंधारी ३, फळणी ३, पावशेवाडी ७ व बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रात १० अशा सुमारे २० गावांमध्ये २०० मशीन्सचे गावोगावी जाऊन वितरण करण्यात आले.
यावेळी केळघरच्या सरपंच सुनीता आटाळे, रामचंद्र मालुसरे, एकनाथ मालुसरे, गोपाळ शिंदे, सुरेश मालुसरे, प्रकाश सुतार उपस्थित होते. या मशीन्सचा गरजू रुग्णांना फायदा होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी रामचंद्र मालुसरे यांच्या या समाजोपयोगी कामाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
फोटो
बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांच्याकडे रामचंद्र मालुसरे यांनी ऑक्सिजन मशीन सुपूर्द केले. (छाया : लक्ष्मण गोरे)