पेट्री : कास पठार कार्यकारी समिती आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती, कासच्यावतीने कार्यक्षेत्रातील सहा गावांना एकूण साठ लाख रुपये निधीचे वाटप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कास पठार प्रवेश शुल्कातील राखीव निधी कार्यक्षेत्रातील सहा गावांच्या विकासासाठी दिला गेला, ही बाब कौतुकास्पद आहे. या मिळालेल्या निधीचा विनियोग गावातील विकासकामांसाठी करून चांगल्या प्रकारची विकासकामे करावीत, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कास पठार कार्यकारी समितीमार्फत पर्यटकांकडून प्रवेश शुल्क जमा करून जमा झालेला राखीव निधी गावांमधील विकासकामांसाठी वापरण्याचा निर्णय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने घेतला होता. दरम्यान, सातारा येथील वन विभागाच्या बैठकीदरम्यान कास (ता. जावळी) गावाला वीस लाख, एकीव (ता. जावळी) गावाला अकरा लाख, आटाळी (ता. सातारा) गावाला साडेनऊ लाख, कासाणी (ता. सातारा) गावाला साडेनऊ लाख, कुसुंबी (ता. जावळी) गावाला पाच लाख, पाटेघर (ता. सातारा) गावाला पाच लाख असा एकूण साठ लाखांचा धनादेश सहा गावांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते देण्यात आला.
या निधीच्या धनादेश वाटप कार्यक्रमाला उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वन विभागाच्या फिरत्या पथकाचे प्रमुख सचिन डोंबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, ज्ञानदेव रांजणे, सहा गावांमधील ग्रामस्थ, कास पठार कार्यकारी समितीचे सदस्य उपस्थित होते.