कऱ्हाड : दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांच्या सहकार्याने स्वयंरोजगार घटकांतर्गत मलकापूर येथील पालिका हद्दीतील कमी उत्पन्न घटकातील लाभार्थ्यांना रिक्षाचे वितरण करण्यात आले. मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, योजनेच्या सहायक प्रकल्प अधिकारी शाहीन मणेर यांची यावेळी उपस्थित होते. लाभार्थ्यांना सात टक्केपर्यंत व्याज अनुदानाचा लाभ मिळतो. व्यवसाय सुरू करणे, व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाहीन मणेर यांनी केले. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शाखाधिकारी मोसिन शिरगुप्पे उपस्थित होते.
अपंग संघटनेतर्फे जीवन संजीवनी प्रशिक्षण
कऱ्हाड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्यावतीने जीवन संजीवनी प्रशिक्षण देण्यात आले. संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. शेखर कोगनुळकर यांनी मार्गदर्शन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, हनुमंतराव अवघडे, सूर्यकांत कोळेकर, स्वप्नील साळुंखे, सुनील डोंगरे, सिराज तांबोळी, रवींद्र चव्हाण, नाजूकबी जमादार, गजानन माने, राजेश खराटे, विक्रांत जाधव, बद्रिनाथ धके, प्रबोधन पुरोहित व अमित बुधकर उपस्थित होते.
रेठरे भागात ऊसतोड अंतिम टप्प्यात
कऱ्हाड : सध्या शेतकऱ्यांची ऊसतोड अंतिम टप्प्यात आली असून, लागण तोड पूर्ण झाली आहे. तर खोडव्याची तोड होण्यासाठी मजूर शेतात दिसत आहेत. कोरोनाची महामारी असतानाही यावर्षी कारखाने ठरल्या वेळेत सुरू झाले. कारखाना वेळेत सुरू होईल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली होती. मात्र, शासन तसेच आरोग्य यंत्रणेने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे महामारी नियंत्रणात आली आणि त्यामुळे ऊसतोड मजुरांना दिलासा मिळाला.
रेव्हिन्यू कॉलनीत नगराध्यक्षांची भेट
कऱ्हाड : येथील रेव्हिन्यू कॉलनी परिसरात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी भेट देऊन विविध प्रश्न समस्या जाणून घेतल्या. रेव्हिन्यू कॉलनी परिसरातील प्रत्येक भागामध्ये पायी फिरून त्यांनी माहिती घेतली. तेथील वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत समस्यांसह अन्य समस्यांच्या निराकरणाची ग्वाही त्यांनी दिली. कॉलनीसह भागात सर्व नागरी सुविधा पोहोचविण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कऱ्हाडला बचत गटांशी पालिकेचा संवाद
कऱ्हाड : पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत शहरातील महिला बचत गटांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून गटचर्चा झाली. त्यामध्ये महिलांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशाप्रकारे बनवता येतील. वस्तूंचा पुनर्वापर कसा करता येईल, याबाबत सविस्तर गटचर्चा करण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विठामाता विद्यालयात आरोग्य शिबिर उत्साहात
कऱ्हाड : येथील पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत शहरातील विठामाता विद्यालयात मुलींसाठी आरोग्य शिबिर व त्यावरील काळजीविषयक परिसंवाद झाला. मुलींना आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, व्यवस्थापक तथा तांत्रिक तज्ज्ञ गीतांजली यादव, व्यवस्थापक तथा समुपदेशक दीपाली रेपाळ आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप झाले.