लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषदेमार्फत जनसुविधा, नागरी सुविधा आणि क वर्गमधील अनेक कामांना ३१ मार्चपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, दोन महिन्यांनंतरही जवळपास ५३ कोटींच्या या कामाचे वाटपच झालेले नाही. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या कामाबद्दल सदस्यांनीच अध्यक्षांकडे तीव्र शब्दांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विकासकामे करण्यात येतात. या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली की पुढील कार्यवाही करण्यात येते. तसेच कामे मार्चअखेरपूर्वी पूर्ण करावीत, असा दंडक असतो. जिल्हा परिषदेअंतर्गत २०२०-२१ मधील जनसुविधा, नागरी सुविधा आणि क वर्गमधील कामांना ३१ मे पूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. ही कामे जवळपास ५३ कोटी रुपयांची आहेत. या अंतर्गत रस्ते, पूल, सभागृह आदी विविध कामे होणार आहेत. पण, या २०२०-२१ मधील या कामांचे दोन महिन्यांनंतरही वाटपच झाले नसल्याचे समोर आले आहे. यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठकही होणार होती. मात्र, मे महिना संपला तरी या बैठकीला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे कामे सुरू करताच आली नाहीत. या कारणांनी सदस्यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे सदस्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कारभाराबद्दल आपली नाराजी तीव्र शब्दांत कथन केली. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल पुन्हा एकदा संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या कानांवरही ही गोष्ट घालण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, २०२०-२१ मधील कामांचे वाटप लवकर व्हावे. तसेच ही कामे सुरू करावीत, अशी मागणी सदस्यांतून होत आहे.
चौकट :
सक्तीच्या रजेवर पाठवा...
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या कामाबद्दल काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका सर्वसाधारण सभेत सदस्यांनी जोरदार आवाज उठविला होता. त्यानंतर आता सदस्यांनी त्यांच्याच कामाबद्दल पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सदस्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणीही केली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
......................................................