कोरेगाव : पारंपरिक रंगसंगती आणि बांधणीतून बाहेर पडत महाराष्टÑ राज्यमार्ग परिवहन महामंडळाने आता आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. एसटीच्या वर्धापनदिनी कॅशलेस प्रवासासाठी स्मार्ट कार्डची घोषणा झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच कोरेगाव आगारात स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.
दरम्यान, कॅशलेस प्रवासाच्या दिशेने एसटीची वाटचाल सुरू असून, प्रवाशांनी या कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताळे यांनी केले आहे.सातारा जिल्हा एसटी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विलास शहा यांना अधिस्वीकृती कार्डधारकाचे स्मार्ट कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक स्मार्टकार्डचे भुताळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. वाहतूक निरीक्षक संजय वायदंडे, सहायक वाहतूक निरीक्षक सुधीर बारटे, लेखाकार प्रमोद गायकवाड, वाहतूक नियंत्रक शंकरराव देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भुताळे म्हणाले, ‘सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास हे ब्रीद घेऊन महामंडळाने ७१ वा वर्धापनदिन नुकताच साजरा केला आहे. काळाच्या ओघात नवीन प्रवाशांच्या मागणीनुसार आणि आधुनिकतेकडे वाटचाल करत नवनवीन योजना महामंडळाने आणल्या आहेत. सातारा विभागात स्मार्ट कार्डचे वितरण करण्यामध्ये कोरेगाव आगाराने प्रथम क्रमांक मिळवला आहे. स्मार्ट कार्ड योजनेमुळे प्रवाशांबरोबरच महामंडळाला निश्चित फायदा होणार आहे.’
विलास शहा म्हणाले, ‘स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना प्रवास करताना जवळ रक्कम नाही घेतली तरी चालणार आहे. त्याचबरोबर सुट्टे पैशांमुळे होणारे वाद आता टाळणार आहेत. आगार स्तरावर स्मार्ट कार्डचे वितरण होत असले तरी भविष्यात छोट्या बसस्थानकावर ही सुविधा उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील प्रवाशांना फायदा होणार आहे.
स्मार्ट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे...कॅशलेस व्यवहाराच्या स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांना आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळेचे बोनाफाईड व आधार कार्ड आवश्यक आहे.या नोंदणीसाठी मोबाईल हँडसेट सोबत आणणे आवश्यक असून, अर्जाचे पाच रुपये व स्मार्ट कार्डचे ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.या कार्डवर सुरुवातीला ३०० रुपयांचे रिचार्ज करावे लागणार असून, त्यानंतर शंभर रुपयांच्या पटीत पाच हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येणार आहे, अशी माहिती वाहतूक नियंत्रक (स्मार्ट कार्ड विभाग) शंकरराव देशमुख यांनी दिली.कोरेगाव येथे विलास शहा यांना स्मार्ट कार्ड प्रदान करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज भुताळे, संजय वायदंडे, प्रमोद गायकवाड, सुधीर बारटे, शंकरराव देशमुख आदी उपस्थित होते. (छाया : साहिल शहा)