सातारा : गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा आणि समृद्ध वन्यजीवनाचे पुरावे अंगाखांद्यावर घेऊन उभ्या असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर बुधवारी दुपारी विघ्नसंतोषी मंडळींनी वणवा पेटविला. आगीत नुकतीच लागवड केलेली रोपे, वन्यजीवांचे खाद्य नष्ट झाले तसेच सरपटणारे प्राणी होरपळले. वणवे लावण्याचे प्रकार शहर आणि जिल्ह्यात वाढत असून, वनविभागाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. डिसेंबर-जानेवारीदरम्यान डोंगरांवरील गवत वाळते. हे गवत छोट्याशा ठिणगीनेही पेट घेत असल्याने कधी गंमत म्हणून, तर कधी चुकीने विडी-काडी टाकणाऱ्यांमुळे शहराच्या आसपासच्या डोंगरांवर वणवे पेटलेले दिसू लागतात. अजिंक्यतारा आणि यवतेश्वर ही शहराजवळील ‘टार्गेट’ विघ्नसंतोषी मंडळी नेहमीच निवडतात. महादरे गावातील युवकांच्या प्रयत्नांमुळे यवतेश्वर डोंगरावरील वणव्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी आले आहे. या युवकांनी प्रसंगी धोका पत्करून वणवे विझविले आहेत. याच डोंगराला लागून असलेल्या भैरोबा डोंगरावरील वणव्यात तीन परप्रांतीय गेल्या वर्षी अडकले होते. त्यातील एकाचा भाजून मृत्यू झाला होता. नंतर काही दिवस वणव्यांचा विषय गंभीरपणे चर्चिला गेला आणि पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ या उक्तीनुसार वणवे दुर्लक्षित केले जाऊ लागले. अजिंक्यतारा किल्ल्यावरही पर्यावरणप्रेमींनी नेहमीच जाऊन वणवे विझविले आहेत; परंतु वणवा पेटताच लोक त्यांच्या क्रमांकावर फोन करून कळवू लागले. जणू दर वेळी वणवा विझविण्याची जबाबदारी त्यांचीच असल्याप्रमाणे असे फोन येतात; तथापि दरवेळी ही मंडळी उपलब्ध असतातच असे नाही. त्यामुळे वणवा लागल्यास तो विझविण्याची; तसेच वणवे लावणाऱ्यांना पकडून कारवाई करण्याची जबाबदारी कुणाची, हे निश्चित होणे गरजेचे आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावरील स्मृतिउद्यानात पालिकेने वृक्षलागवड केली आहे. तथापि, किल्ल्याचा परिसर सामाजिक वनीकरण विभाग आणि वनविभागाच्या अखत्यारीत येतो. या हद्दी वनस्पती आणि पशुपक्ष्यांना मात्र माहीत नसतात. आगही हद्दी मानत नाही. वणव्यात अजिंक्यताऱ्यावरील सरपटणारे जीव मृत्युमुखी पडत आहेत. तसेच मोठ्या संख्येने असणाऱ्या मोरांनाही झळ पोहोचत आहे. साळिंदर, तरस असे वन्यजीव किल्ल्याच्या परिसरात नेहमी आढळतात. काही हिंस्रपशूंचीही ये-जा असते. आगीची झळ लागलेला एखादा हिंस्र वन्यजीव शहरात शिरल्यास काय घडेल, याचाही विचार संबंधित यंत्रणांनी केलेला बरा! त्यामुळे वणवे लागू नयेत म्हणून साध्या वेशात सतत टेहळणी आणि वणवे लावताना सापडल्यास कडक कारवाई या गोष्टी तातडीने होणे आवश्यक आहे. ही टेहळणी केवळ कोरडे गवत असण्याच्या कालावधीतच करावयाची असल्याने हंगामी स्वरूपात संमिश्र पथक तयार करण्याचा पर्यायही चोखाळून पाहायला हवा. पालिका, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
अंधश्रद्धा, गैरसमज कारणीभूत आपोआप किंवा चुकीने लागणाऱ्या वणव्यांची संख्या नगण्य असते. वणवे एक तर अंधश्रद्धेतून आणि गैरसमजुतींमधून लावले जातात किंवा विघ्नसंतोषीपणे मजा म्हणून. डोंगरावरील गवत जाळून टाकले की पुढील वर्षी भरघोस गवत उगवते या अंधश्रद्धेतून काही ठिकाणी वणवे लावले जातात. परंतु यात काहीही तथ्य नाही. चरणाऱ्या जनावरांनी अर्धवट खाल्लेल्या गवताचे बुडखे काही वेळा पुन्हा त्या ठिकाणी चरताना जनावरांच्या हिरड्यांना इजा करतात. हा धोका टाळण्यासाठीही आगी लावल्या जातात. तथापि, बेजबाबदार पर्यटक आणि हुल्लडबाजांकडून वणवे लावण्याचे प्रकार सातारा परिसरात सर्वाधिक घडत असल्याचे पाहायला मिळते.