सातारा : जिल्ह्यातील जी गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली गेली नाहीत, अशा गावांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील १८७ किलोमीटरचे रस्ते पक्के करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील १८७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती शिवतारे यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहातील बैठकीत पालकमंत्री शिवतारे बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई, पुणे प्रादेशिक विभागाचे अधीक्षक अभियंता वि.द.पालवे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. निकषात बसणारे तालुकानिहाय रस्ते विचारात घेऊन जिल्ह्यातील १८७ किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. शासनाने सूचना निर्गमित केल्याप्रमाणे फेब्रुवारीमध्ये मंजूर कामांच्या निविदा काढण्याबाबत व काटेकोरपणे सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्याबाबत अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी सूचना केल्या.दरम्यान, पाटण तालुक्यातील २५ किलोमीटर मर्यादित रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकरिता प्रस्तावित करण्यात आली, असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. २0१५-१६ व २0१६-१७ चा आराखडा या बैठकीत तयार करण्यात आला. (प्रतिनिधी) नकाशाचा अभ्यास...मुख्यमंत्री ग्रामडसडक योजनेच्या विश्रामगृहावर झालेल्या बैठकीमध्ये रस्त्यांचा नकाशा मांडण्यात आला होता. पालकमंत्री विजय शिवतारे हे आ. शशिकांत शिंदे व आ. शंभूराज देसाई यांच्याकडून रस्त्यांच्या जाळ्यांचा हा नकाशा समजून घेत होते.
जिल्ह्यात १८७ किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री योजनेत पक्के करणार
By admin | Published: January 27, 2016 10:57 PM