सातारा : नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोटा जमा करण्याच्या झालेल्या प्रक्रियेबाबत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी केली. याबाबतची माहिती मात्र अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहे. जुन्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर बँकांमधून किती नोटा बदलून दिल्या गेल्या. तसेच सेव्हिंगच्या खात्यातही किती जमा केल्या. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दि. १० ते १४ नोव्हेंबर या कालावधीत तब्बल ३०९ कोटी रुपये जमा झाले. मात्र, दि. १४ नोव्हेंबरनंतर जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे बँकेने बंदी घातलेल्या जुन्या नोटा स्वीकारणे बँकेने बंद केले होते. मात्र, १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये जुन्या नोटा जमा केल्या गेल्या, तेव्हा बँकांमध्ये ग्राहकांची जी गर्दी झाली, त्याचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले. हे फुटेज आयकर अधिकाऱ्यांनी मंगळवारी तपासले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सेव्हिंग खात्यावर अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहेत, त्यांची सेव्हिंग खाती आयकर खात्याने रडारवर घेतली आहेत. ही रक्कम स्वीकारताना जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेचे नियम पाळले का?, ज्या रकमा स्वीकारल्या त्यांची केवायसी घेतली का?, करन्सी चेस्टमधून जिल्हा बँकेला मिळालेल्या १६७ कोटी रुपयांच्या रकमेचे योग्य पद्धतीने वितरण झाले आहे का?, या बाबींची तपासणी आयकर विभागाने चालू ठेवली होती. दरम्यान, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही चौकशी गोपनीय असल्याने त्याबाबतची माहिती आयकर विभागाचा अहवाल आल्यानंतरच देण्यात येईल, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यशवंतराव चव्हाण यांनी १९५५ मध्ये स्थापन केलेली जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या घामावर मोठी झाली आहे. आयकर विभागाच्या चौकशीत कुठलीही चुकीची बाब आढळून येणार नाही, याचा आम्हाला विश्वास आहे.- सुनील माने, उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक.
जिल्हा बँकेतील सीसीटीव्हीची तपासणी
By admin | Published: December 21, 2016 11:46 PM