सातारा : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत अंतिम स्पर्धेपर्यंत धडक मारलेल्या माण तालुक्यातील मोही येथील ललिता बाबर हिचा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी बँकेतर्फे ललिताला ५ लाखांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. ‘सातारा एक्स्प्रेस’ म्हणून जगभर नावलौकिक मिळविलेल्या ललिताचा जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सत्कार करण्यात आला. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, संचालक अनिल देसाई, दादाराजे खर्डेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ललिताला ५ लाखांचा धनादेश देण्यात आला. २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळविण्याचा दृढनिश्चय ललिताने केला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी तिला पुढच्या काळात ही मदत उपयोगी पडणार असून, आगामी चार वर्षांमध्ये जिल्हा बँकेला होणाऱ्या नफ्यातून काही रक्कम मदत म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. मानपत्र, सन्मानचिन्ह व धनादेश देऊन गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेतर्फे ललिताला ५ लाखांची मदत
By admin | Published: August 28, 2016 12:03 AM