सातारा : ‘जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार हा वरून सोवळे अन् आतून काळेबेरे, असा सुरू आहे. व्हिडिओकॉन, सहारा, किंग फिशर या कंपन्या जशा वरून चकचकीत वाटत होत्या, तोच प्रकार जिल्हा बँकेत असून, सत्ताधा ऱ्यांनी या बँकेला प्रायव्हेट लिमिटेड करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे,’ अशी जळजळीत टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आनुषंगाने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून पक्षविरहित आघाडी करून बँकेत बिनविरोध सत्ता मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या आघाडीत आमदार जयकुमार गोरे असणार का? यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. पक्षविरहित आघाडीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना घेण्याच्या हालचाली सुरु असल्या तरी त्याच पक्षाचे आमदार व जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक जयकुमार गोरे यांना बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार व्यूहरचना आखलेली आहे. आता आमदार गोरे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात असतील का? याबाबत जिल्ह्यातील जनतेला उत्सुकता लागून राहिलेली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार गोरे यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेल्या संवादात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. आ. गोरे म्हणाले, ‘जिल्हा बँकेत विरोधकांना स्थान मिळू नये, यासाठी सोयीने सभासद नोंदणी केली गेली असून, विरोधात जाणारे ठराव रद्द करणे तसेच त्या सभासदांना अक्रियाशील ठरविण्याचे निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतलेले आहेत. आधीच जिल्हा बँकेची मतदारसंख्या केवळ २ हजार ६३० आहेत. त्यातील ६९६ सभासद अक्रियाशील ठरवले आता केवळ १ हजार ९३४ सभासद उरले आहेत, एवढ्या कमी मतदारांच्या आधारावर जिल्हा बँक ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहेत.’
सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाविरोधात योग्य ठिकाणी न्याय मागितला जाईल. मला संघर्षाची सवय आहे. सहकार खाते आपल्या ताब्यात असल्याने सत्ताधारी बँक बिनविरोध करण्याचे स्वप्न पाहत आहेत, आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार गोरे यांनी करुन आगामी काळातील संघर्षाचे रणशिंगच फुंकले आहे.
बँक मोठी सभासद संख्या कमी...
सातारा जिल्हा बँकेत गेल्या दहा वर्षांमध्ये नवीन सभासद नोंदणीच झालेली नाही. शेजारच्या जिल्ह्यांतील मध्यवर्ती बँकांची सभासद संख्या मोठी आहे, त्याच्या उलट चित्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे. कोल्हापूरला २० हजार, सांगलीत १४ हजार, तर पुणे जिल्हा बँकेचे २५ हजार सभासद आहेत, तर मग सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद केवळ २ जार ६३० का? असा सवालदेखील आमदार गोरे यांनी उपस्थित केला आहे.
चौकट..
ठराव दाखलसाठी २२ फेब्रुवारीची मुदत
जिल्हा बँकेसाठी आत्तापर्यंत १ हजार ५८३ ठराव दाखल झालेले आहेत. जिल्हा बँकेचे २ हजार ६०० सभासद आहेत. उर्वरित ठराव दाखल करून घेण्यासाठी सोमवार, दि. २२ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर ठराव स्वीकारले जाणार नसल्याने तालुका निबंधक कार्यालयांमध्ये गर्दी पहायला मिळते.
चौकट..
बँका बुडविणारेच संचालक मंडळात
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळामध्ये चार ते पाच संचालक असे आहेत, ज्यांनी बँका बुडवून सभासदांना वाऱ्यांवर सोडले आहे. आता त्यांनाच पुन्हा जिल्हा बँकेत घेण्याचे खटाटोप सुरू असल्याची टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे.
कोट...
जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. काही मोजके लोक ही बँक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी खटाटोप करत आहेत. ही बँक लिमिटेड कंपनी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हे आता जास्त काळ चालणार नाही.
- आमदार जयकुमार गोरे, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक
जिल्हा बँकेचा फोटो व आमदार जयकुमार गोरे यांचा आयकार्ड फोटो वापरावा