फलटण : कोरोना महामारीमध्ये अत्यंत वाईट अशी परिस्थिती निर्माण झाली असताना रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच उपलब्ध होत नाही, अशा परिस्थितीमध्ये विविध सामाजिक संस्थांच्यावतीने कोविड सेंटर उभी केली आहेत. याला कै. हिंदुराव नाईक-निंबाळकर कोविड सेंटर या नावाने डीसीएचसी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी ५१ बेडची परवानगी दिली आहे.
फलटण परिसरातील जनतेची सोय होणार आहे. यामध्ये लोकांना विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
फलटण भाजप शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी फलटण येथील रविवार पेठेत असणाऱ्या उत्कर्ष लॉजमध्ये २४ ऑक्सिजन बेड व दोन व्हेंटिलेटर, २५ सामान्य बेड असे एकूण ५१ बेडचे कोरोना हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी)मध्ये रूपांतर करण्याची विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. या विनंतीवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे यांनी ५१ बेडचे कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत हरकत नाही, असा अहवाल सादर केलेला आहे. तसेच कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे त्यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आवश्यकतेनुसार मनुष्यबळ पुरवावे, असे त्यांनी म्हटले आहे.
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नांतून होत असलेल्या या कोविड सेंटरची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून, त्वरित ते सुरू करण्यात येणार असल्याचे अमोल सस्ते यांनी स्पष्ट केले आहे.
०८फलटण
फोटो : कोरोना हेल्थ सेंटरची पाहणी करताना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अमोल सस्ते, अभिजित नाईक-निंबाळकर, अनुप शहा, डॉ. सुभाष गुळवे, आदी उपस्थित होते.