वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण मागील दीड महिन्यापासून वाढत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी माण तालुक्यातील मार्डी, म्हसवड, वावरहिरे, बिदाल या गावांमध्ये सुरु केलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षांना भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर संबंधितांना सूचना केल्या.
यावेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ‘गृह अलगीकरणामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करावेत. यासाठी प्रत्येक गावातील ग्रामदक्षता समितीने पुढाकार घ्यावा. विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या तपासणीसाठी उपकेंद्रातील डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका तसेच खासगी डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात यावे. आशा सेविकांनी कोमॉर्बिड सर्वेक्षणाचे काम नियमितपणे करावे व त्यांची माहिती संबंधितांना तत्काळ द्यावी. गावपातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी गावात लक्ष केंद्रीत करुन कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत’.