सातारा : वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणाºया वाई येथील संतोष पोळ याने केलेल्या सहा हत्याकांड प्रकरणात माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे हिचा शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन रद्द केला.
याबाबत माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी वाई येथील डॉक्टर घोटावळेकर यांच्या दवाखान्यातील कंपाऊंडर असलेल्या संतोष पोळ याने सोन्याचे दागिने आणि पैशाच्या हव्यासापोटी पाच महिलांसह सहाजणांचा खून केला होता. अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्षा मंगला जेधे यांच्या खुनानंतर वाई पोलिसांनी संतोष पोळ याला अटक केली. त्यानंतर पोळ याने केलेल्या सर्व खुनांची उकल झाली. पोलिसांनी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ ए. ए. जे. खान यांच्यासमोर संतोष पोळ याच्या विरुद्ध पुराव्यांची जंत्री सादर करून खटल्याची सुनावणी सुरू व्हावी, अशी मागणी केली. या खटल्याची २६ डिसेंबरपासून सुनावणी होणार आहे. तसेच माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे हिने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, संतोष पोळबरोबर गुन्ह्यात सहभाग असल्याने तसेच ती माफीची साक्षीदार असल्याने न्यायालयाने तिचा जामीन रद्द केला.