सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आला असतानाच साठा संपल्याने ब्रेक बसला होता. मात्र, शुक्रवारी रात्री ३५ हजार डोस जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे दोन दिवस लसीकरण चालू शकते. तर जिल्ह्याला आणखी कोरोना लसीचे ३९ हजार डोस मिळणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात मागील अडीच महिन्यांपासून कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. सुरुवातीला ४५ वर्षांवरील कोमॉर्बिड व्यक्ती आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लसीकरण करण्यात आले. यासाठी खासगी तसेच शासकीय रुग्णालयांतही ही मोहीम सुरू झाली. त्यानंतर आता एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचा निर्णय झाला. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तर प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच उपकेंद्रातही लसीकरण सुरू केले. त्यासाठी उपकेंद्रात कधी लसीकरण होणार याची तारीखही निश्चित केली. संबंधित तारखेला ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना लस टोचण्यात येणार होती. पण, चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा संपला. त्यामुळे लसीकरण मोहीम थांबविण्यात आली. त्यामुळे दोन दिवस कोरोना लस देण्यात आलीच नाही.
आरोग्य विभागाने कोरोना लसीची मागणी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी वाहन पुणे येथे गेले. त्याठिकाणी जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे ३५ हजार डोस मिळाले. साताऱ्यात लस आल्यानंतर त्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे शनिवारी काही केंद्रांवर लसीकरण झाले. तर जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे आणखी ३९ हजार डोस मिळणार आहेत. त्यामुळे काही दिवस ही मोहीम आणखी वेगाने चालणार आहे.
चौकट :
पावणे तीन लाख लोकांना लस
जिल्ह्यातील आरोग्य विभागाने दररोज २० हजार लोकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार पूर्णपणे नियोजन झालेले आहे. मागील काही दिवसांचा विचार करता आरोग्य विभागाने दिवसात २० हजारांच्यावर लोकांनाही लस दिली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातील पावणे तीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
..................................................