वाठार स्टेशन : जिल्हा परिषदेच्या वाठार स्टेशन गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य राहुल बबनराव कदम यांना त्यांच्या कुटुंबीयांसह जिवे मारण्याची धमकी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याने दिल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर आणि कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांची नावे घेऊन या कार्यकर्त्याने कदम यांच्या घरातच धिंगाणा घातल्याची फिर्याद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. शहापूर (ता. कोरेगाव) येथील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जितेंद्र दिनकर माने याच्या विरोधात कदम यांनी यासंदर्भात वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत कदम यांनी म्हटले आहे की, ‘गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास शहापूर येथील जितेंद्र माने याने मला फोन केला. माझे तुमच्याकडे काम आहे. त्यामुळे तुम्ही घरीच थांबा; नाहीतर मोठे नुकसान होईल, असे त्याने फोनवर सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात माने हा माझ्या घरी आला. त्याला पाणी व सरबत दिले आणि काय काम आहे, असे विचारले. सरबताचा मोकळा ग्लास नेण्यासाठी माझी पत्नी आली असता काहीही कारण नसताना जितेंद्रने आज तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून जोरजोरात शिवीगाळ करत धमकी दिली. त्यावेळी माझी पत्नी, दोन मुली आणि चुलत बहीण घरात होते. ते घाबरले असल्याने अशी भाषा वापरू नको, असे मी त्याला सांगितले. मात्र, धक्काबुक्की करून एक लाखाची रक्कमही त्याने हिसकावून घेतली. नंतर लाकडी दांडक्याचा धाक दाखवून तो एमएच ११ - ९९९९ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून निघून गेला.’‘जितेंद्र माने याच्याकडून माझ्या व कुटुंबीयांच्या जीवितास धोका आहे,’ असेही राहुल कदम यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)कपडे फाडून बदनामीची धमकी !‘रामराजे आणि शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे की, तुझ्या घरातील एकही व्यक्ती जिवंत सोडू नका, असे बोलून जितेंद्रने घरातील गॅस सिलिंडरकडे बोट दाखविले व सिलिंडरचा स्फोट करून घर उडवून देण्याची धमकी दिली. नंतर जितेंद्रने स्वत:चे कपडे स्वत:च फाडले आणि आता बाहेर जाऊन तुझी बदनामी करतो, असे सांगत घरात धुडगूस घातला,’ असेही राहुल कदम यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
जि. प. सदस्याला जिवे मारण्याची धमकी
By admin | Published: February 27, 2015 10:59 PM