सातारा : जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून पहिल्यांदाच जिल्ह्याला लसीचे ७९ हजार डोस मिळाले आहेत. यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वयोगटातील कोमॉर्बिड नागरिकांना लसीकरण सुरू झाले. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. या लसीकरणासाठी शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रे तसेच काही खासगी रुग्णालयात सुविधा निर्माण करण्यात आली. सद्य:स्थितीत १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ९ लाख नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळालाय. पण, कोरोना लस कमी प्रमाणात मिळत असल्याने ही मोहीम धीम्या गतीने सुरू होती. आतापर्यंत कधी ५ हजार, १० हजार, २०, २५ हजारांवर कोरोना लसीचे डोस मिळाले. पण, बुधवारी रात्री प्रथमच जिल्ह्याला कोविशिल्डचे ६९ हजार तर कोव्हॅक्सिनचे ९ हजारांवर डोस मिळाले. या लसीचे वाटपही करण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून लसीकरण मोहीम काही दिवस तरी वेगाने चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
...........................................................