सातारा : येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांना शिवीगाळ आणि दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणण्यात आला. याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल जगताप (पूर्ण नाव पत्ता नाही. रा. सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काल, गुरुवार (दि. १५) दुपारच्या सुमारास हा प्रकार जिल्हा शासकीय रुग्णालयात घडला. संशयिताने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या केबिनमध्ये येण्यापूर्वी खोली क्रमांक २२ मध्ये अभ्यागत कक्षात बसलेल्या लोकांना शिवीगाळ व दमदाटी केली होती. तसेच तेथील कागदपत्रे आणि फाइल्स विसकटून टाकल्या. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या केबिनमध्ये येऊन शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की करण्यात आली तसेच शासकीय कामात अडथळा आणला.सातारा शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक मुसळे अधिक तपास करत आहेत.चोरीचाही गुन्हा दाखल...जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील कॅंटीनसमोर संशयिताने टेम्पो चालक मंगेश उमेश चव्हाण (रा. कारंडवाडी, सातारा) याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु, चव्हाणने नकार दिला. त्यामुळे जगतापने चव्हाणच्या खिशातून जबरदस्तीने ५०० रुपयांची नोट काढून घेतली. याप्रकरणीही सातारा शहर पोलिस ठाण्यात राहुल जगतापविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांना शिवीगाळ; साताऱ्यात एकाविरोधात गुन्हा दाखल
By नितीन काळेल | Published: December 16, 2022 3:51 PM