कोपर्डे हवेली : गत वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. तर दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय सोयाबीनचे बाजारपेठेतील दरही पडले असल्याने त्याची विक्री कवडीमोल दराने होत आहे. जिरायती आणि बागायती शेतीमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी जादा पावसाने सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पाणी शेतात साचून राहिल्याने कुजून गेले. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादनाचा उतारा १४ क्विंटल होता. तर सध्या उतारा ५ ते ८ क्विंटल पडत आहे. उत्पादन खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. तर दीपावली काही दिवसांवर आल्याने खर्चासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करू लागले आहेत. दर नसल्याने त्याची विक्री कवडीमोल दराने होत आहे. १४ फॅट असलेल्या सोयाबीनचा क्विंटलचा २ दोन हजार ७०० रुपये आहे. हेच दर ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांमध्ये वेगवेगळे आहेत. त्यामध्ये ५० ते १०० रुपयांचा फरक दिसत आहे. हाच दर तीन ते चार महिन्यांपूर्वी ४ हजार ८०० पर्यंत होता. १७ फॅट असणाऱ्या सोयाबीनला क्विंटलमागे १५ ते १७ किलोची तूट धरून दर देत आहेत. वाळलेल्या सोयाबीनला दर चांगला भेटतो. दर चांगला मिळण्यासाठी फॅट चांगली लागते, असे कारण व्यापारी सांगत आहेत. दर कधी वाढतील हे सध्या सांगता येत नसल्याने आणि पैशाची गरज असल्याने अनेक शेतकरी सोयाबिनची विक्री करत आहेत. प्रत्येक दिवशी दर बदलत आहेत. काही शेतकरी विक्री करावी का नको, अशा दुहेरी विचारात आहेत. कित्येक वर्षे शासनाचे धोरण सोयाबीनच्या बाबतीत उदासीन असल्याने आणि दर कोण ठरवते, याची माहिती नसल्याने शेतकऱ्यांच्यात संताप दिसून येत आहे. (वार्ताहर) सोयाबीन ठेवायचं की विकायचं ? दीपावलीचा सण काही दिवसांवर आल्याने अनेक शेतकरी गरजेसाठी सोयाबीनची विक्री करत आहेत. तर उत्पादन घटल्याने सोयाबीन शेती तोट्यात गेली आहे. दरामध्ये सातत्य राहत नाही. त्यामुळे विक्री करावी का नको, या मानसिकेत अनेक शेतकरी आहेत. काही शेतकरी उत्पादीत केलेले सोयाबीन घरीच ठेवण्याच्या मानसिकतेत आहेत. ज्यावेळी दर वाढेल, त्यावेळी सोयाबीन विक्रीसाठी आणण्याचा विचार आहे. दर कधी वाढेल हे सांगता येत नाही. पेंडची निर्यात घटल्याचा परिणाम... सोयाबीनचे गाळप होऊन त्यातून तयार झालेली पेंड निर्यात केली जाते. मात्र, सध्या सोयाबीनच्या पेंडची निर्यात घटली आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतातील पेंडची किंमत जास्त आहे. त्यामुळे ही निर्यात घटली असून, त्याचा परिणाम सोयाबीनवर होत आहे. पेंडची निर्यात जास्त झाल्यास दर वाढतो. मात्र, सध्या निर्यात कमी असल्याने सोयाबीनचा दर कमी झाला असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सोयाबीनचे उत्पादन जगभर घेतले जाते. जगभरात दरवर्षी सुमारे ३ हजार लाख टन सोयाबीन पिकते. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका १ हजार १०० लाख टन, अर्जंेटिना ६०० लाख टन, ब्राझील ९०० लाख टन, इतर राष्ट्रे ५०० लाख टनांपर्यंत या पिकाचे उत्पादन निघते. त्या तुलनेत भारतामध्ये फक्त ११० लाख टन सोयाबीन उत्पादीत होते.
दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचं दिवाळं !
By admin | Published: October 24, 2016 12:41 AM