लोकमत न्यूज नेटवर्कमेढा/सायगाव : यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत या गडचिरोली पोलिसांच्या अनोख्या उपक्रमाला साथ देण्यासाठी मेढा पोलिसांनी सोशल मीडियावर कपडे, फराळ, संसारोपयोगी साहित्य देण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जावळी तालुक्यातील पवारवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिसरात पदयात्रा काढून मोठ्या प्रमाणात साहित्य गोळा करून मेढा पोलिसांकडे सुपूर्द केले.पवारवाडी शाळेने जोपासलेली ही सामाजिक बांधिलकी इतरांसाठी आदर्शवत अशीच आहे, असे गौरवोदगार सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी काढले.गडचिरोली हा नक्षली तसेच आदिवासी भाग आहे. याठिकाणी वास्तव्य करणाºया लोकांच्या आयुष्यात कधी दिवाळीची पहाट उजाडलेलीच नाही. या आदिवासी लोकांच्या आयुष्यातही दिवाळीची पहाट यावी, यासाठी येथील पोलिसांनी यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत असा अनोखा उपक्रम राबवला आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले आहे.गडचिरोलीच्या पोलिसांचे या अनोखा उपक्रमाला बळ देण्यासाठी मेढा पोलिसांनीही कंबर कसली असून, त्यांनीही सोशल मीडियावरून जावळीकराना मदतीचे आवाहन केले होते.पवारवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलने मेढा पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी सुयोग्य नियोजन करून पवारवाडीसह परिसरातील गावांमधून पदयात्रा काढून दिवाळीचा फराळ, कपडे तसेच संसारोपयोगी साहित्य गोळा केले. हे सर्व साहित्य पोलिसांकडे सुपूर्द करण्यासाठी शाळेने कार्यक्रमाचे आयोजन करून पोलिसांना त्याठिकाणी बोलावून हे सर्व साहित्य मेढा पोलिसांकडे सुपूर्द केले.
गडचिरोलीतील बांधवांसाठी पवारवाडीतून दिवाळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 11:40 PM