सातारा ,दि. ३० : दिवाळीच्या सुटीत पंधरा दिवस धम्माल मौज-मजा केली... दिवाळी फराळ भरपूर खाल्ला... मामाच्या मुलांबरोबर मनसोक्त खेळणं झालं... नवीन मित्र मिळाले... पण आता सुटी संपत आली. त्यामुळे भाचे कंपनीला मामाच्या गावाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. परत जावं असं वाटत नसलं तरी सुटीतला शेवटचा रविवार असल्याने परतू लागले आहेत.
शाळा-महाविद्यालयांना दिवाळी सुटी उशिराच सुरू झाली. काही शाळांना शुक्रवार, दि. १३ पासून सुट्या लागल्या. त्यामुळे दोन दिवसांत ही मुलं दिवाळीसाठी मामाच्या गावाला गेले आहेत. तसेच पुणे, मुंबई किंवा राज्याच्या विविध भागातून भाचे कंपनी मामाच्या गावासाठी साताऱ्या त आली होती.
- जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवार, दि. ०६ रोजी सुरू होत असल्या तर इंग्रजी माध्यमांच्या प्रत्येक शाळा वेगवेगळ्या तारखांना सुरू होत आहेत. काही शाळा सोमवार, दि. ३० पासून सुरू होत आहेत. तर काही शाळा १ तारखेपासून सुरू होत आहेत. परंतु हा शेवटचा रविवार असल्याने या सुटीत सोडण्याची जबाबदारी मोठ्यांनी घेतली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सर्वच बसस्थानकात रविवारी सकाळपासून गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. तसेच महामंडळानेही अनेक मोठ्या गावांमध्ये जादा गाड्या सोडल्या आहेत.