सातारा : सातारा पालिकेला कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करण्यासाठी तब्बल ७७ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान द्यावे लागणार आहे. मात्र पदवीधर मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता साताऱ्यात लागू झाल्याने सानुग्रह अनुदानाच्या प्रस्तावाला कार्योत्तर मंजुरी दिली जाणार आहे.आठवडाभरापूर्वी सातारा पालिकेतील दोन स्वतंत्र कर्मचारी संघटनांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेऊन पंधरा आणि वीस हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात झालेल्या बैठकीस पालिका कर्मचारी संघाचे मार्गदर्शक अॅड डी .व्ही. पाटील यांच्या उपस्थितीत कर्मचारी शिष्टमंडळ व पालिका प्रशासनाची बैठक झाली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी अभिजित बापट यावेळी उपस्थित होती.
गतवर्षी दिवाळीला पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यापेक्षा जास्त अनुदान मिळावे, असा आग्रह कामगार शिष्टमंडळाचा होता. कोरोनाच्या काळात पालिका कर्मचाऱ्यांनी शहराची व्यवस्था सांभाळत रोग निर्मूलनाचे काम उत्तमरीत्या केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना समाधानकारक अनुदान देण्याची विनंती अॅड डी. व्ही. पाटील यांनी केली. चर्चेदरम्यान पंधरा ते वीस या दरम्यानचा मध्य काढून सतरा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा पालिका कर्मचाऱ्यांना सतरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची सूचना केली होती.
वित्त व लेखा विभागाला मंगळवारी बैठक होऊनही या संदर्भातील कोणताही लेखी आदेश मुख्याधिकाऱ्यांकडून प्राप्त झाला नव्हता. सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सर्वसाधाण सभेत मंजूर करावयाचे नियोजन होते. मात्र, पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता जाहीर झाल्याने सर्वसाधारण सभा आणि त्याचा अजेंडा नियमात अडकला आहे . त्यामुळे सानुग्रह च्या प्रस्तावाला कार्योत्तर मंजूरी घ्यावी लागणार आहे.