लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगाम सुरू झाल्यामुळे महाबळेश्वर शहर व परिसर गर्दीने फुलले असून, इथले निसर्ग सौंदर्य पाहण्यात पर्यटक मश्गुल झाले आहेत. तापोळा, पाचगणी, प्रतापगड, आॅर्थरसीट पार्इंट, केटसपॉर्इंट याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.नेहमीप्रमाणे या ठिकाणावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा प्रयत्न करताना दिसत आहे. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले महाबळेश्वर सध्या दिवाळी सुटीमुळे फुलले असून, पर्यटकांची मोठी रेलचेल पाहावयास मिळत आहे. दिवाळी सुटीमुळे मोठ्या संख्येने विविध राज्यातून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये गुजरात राज्यामधून आलेल्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. पर्यटनास प्रसिद्ध केटस पॉर्इंट, आॅर्थरसीट पॉर्इंट, क्षेत्र महाबळेश्वरसह सूर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉर्इंट ही स्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. अंतर्गत असणारे रस्ते अतिशय खराब झाल्यामुळे पर्यटनासाठी आलेले पर्यटक व टॅक्सी व्यवसाय करणाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.नौका विहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला नौकाविहाराचा आनंद लुटताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत. नौकाविहारासोबतचघोडेसवारी, गेम्स, स्ट्रॉबेरीपासून बनविलेली विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस यावर ताव मारताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.दिवाळी हंगामामुळे सलग आलेल्या सुट्यांमुळे महाबळेश्वर गजबजून गेले आहे. वेण्णालेक येथे पर्यटकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.स्वागतासाठी येथील मुख्य बाजारपेठा सजल्या असून, मोठ्या प्रमाणावर पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल, चणे, जाम खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. नगरपरिषदेच्या वतीने नूतन वाहनतळ तसेच ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. वेण्णालेकसह काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत आहे. मात्र पोलिस प्रशासन अधिक कुमक मागवून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.
पर्यटकांची महाबळेश्वरात दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:48 PM