महाबळेश्वर : ‘माचुतर गावावर पावसाळ्यात दरड कोसळली होती. ही दरड डोंगर उतारावरील रस्त्यावर थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. ही दुर्घटना टळली असली तरी ती पुन्हा येऊ नये यासाठी गावाच्या मागणीप्रमाणे माचुतरच्या खालच्या वाडीचे पुनर्वसन डोंगर माथ्यावर करण्याचा प्रस्ताव आपण शासनाला सादर केला आहे. गावावरचे दरडी कोसळण्याचे संकट कायमचे दूर करून गाव संकटमुक्त करू,’ अशी ग्वाही आमदार मकरंद पाटील यांनी दिली.महाबळेश्वर तालुक्यातील माचूतर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब भिलारे, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष किसन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी उपसभापती संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.माचुतर गावचे सुपुत्र किसन शिंदे व सुनील शिंदे यांची महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले त्याबद्दल गावच्या वतीने आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला तसेच नूतन नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक संदीप साळुंखे, कुमार शिंदे, विमल पारठे, विमल आेंबळे, शारदा ढाणक, युसूफ शेख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला ़माजी उपसभापती रामचंद्र शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. बाळासाहेब भिलारे, संजय गायकवाड, नगरसेवक कुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केल. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिलारे, संजय मोरे, विठ्ठल जाधव, सुरेश शिंदे , उपसरपंच नारायण शिंदे, विठ्ठल शिंदे,मधुकर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बापू शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मुन्ना वारुणकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
दरडी कोसळण्याचे संकट दूर करू
By admin | Published: January 04, 2017 10:22 PM