खटाव : खटावसह परिसरात असलेल्या हुसेनपूर येथील शेतीचा विद्युत पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित केल्यामुळे शिवारात शेतकऱ्यांनी खटावमधील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याबाबत निवेदन दिले.
खटाव तसेच हुसेनपूर हद्दीत असलेल्या विहिरी व बोअरवेलवरील वीज कनेक्शन्स गेल्या तीन दिवसांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत मंडळाच्यावतीने बंद करण्यात आल्यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे. परिणामी खोल विहिरीत उतरून पाणी आणावे लागत आहे. यातच विहिरीत पडून एखादी घटना घडू शकते. अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. विद्युत मंडळाने कोणतीही पूर्वकल्पना न देता विजेची कनेक्शन्स तोडण्यास सुरुवात केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले.
यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राजेंद्र करळे, श्रीरंग इंगळे, राहुल देशमुख, शिवाजी घाडगे, मोहन जाधव, उत्तम बोर्गे, मुसा काझी, रमेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत कोणत्याही कृषी पंपाच्या बिलाची मागणी केली गेलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांची थकबाकी वाढली आहे. सध्या शेतकऱ्यांची शेतामध्ये असणारी पिके अंतिम टप्प्यात आहेत. त्यांना आता पाण्याची गरज आहे. अशावेळी वीज कनेक्शन्स तोडल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच कित्येक शेतकऱ्यांची ऊस बिले कारखान्याकडून जमा झालेली नाहीत. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन्स तोडण्याचा सपाटा लावला आहे. शेतकऱ्यांना थोडीशी मुदत देऊन ही थकीत बिले वसूल करावीत, शेतकऱ्यांनी शेती पंपाची बिले भरावीत हा आग्रह असला तरी, शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. शेतकऱ्यांनी वीज बिल टप्प्या-टप्प्याने भरून सहकार्य करावे.