ऑनलाइन लोकमत
परिवर्तन संस्थेचा संकल्प : नववर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाईला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी उपक्रम
सातारा, दि. 31 - ‘दारू नको, दूध प्या... चला व्यसन बदनाम करूया...’ अशा घोषणा देत साता-यातील पोवई नाक्यावरील शिवाजी सर्कल परिसरात शनिवारी परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था व अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे तरुणांना मोफत दूध वाटप केले.
थर्टी फर्स्टला पार्टी करण्याकडे तरुणाईचा ओढा असतो. यामध्ये ओल्या पार्ट्या अन् मद्यपान केले जाते. व्यसनाधिनतेकडे चाललेल्या तरुणाईला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी साताºयातील परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था व अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दरवर्षी ३१ डिसेंबरला जनजागृती कार्यक्रम आयोजित केला जातो. पोवई नाक्यावरील शिवाजी सर्कल परिसरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅनर लावून व्यसनमुक्तीच्या घोषणा दिल्या. तसेच तरुणांना पिण्यासाठी मोफत दूध देण्यात आले. यावेळी ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस, पश्चिम महाराष्ट्र विभाग हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, किशोर काळोखे, उदय चव्हाण उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शनिवार, दि. ३१ रोजी दारूची दुकाने रात्री एकपर्यंत सुरू ठेवण्याची विशेष परवानगी देण्याचे निर्देश राज्य शासनाने जाहीर केले आहेत. हा निर्देश तरुणांसाठी घातक आहे. रात्री उशिरापर्यंत दारू दुकाने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय म्हणजे समाजात व्यसनाधिनता वाढवणे आहे. व्यसन करून वाहने चालविल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसनाला बदनाम करण्यासाठी तरुणांनीच एकत्र येण्याची गरज आहे.