कऱ्हाड : काळ्या पैशाच्या लढाईविरोधात घेतलेला कोणताही निर्णय हा स्वागतार्ह आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने काढलेल्या पत्रकात त्यांनी जे खुलासे दिले आहेत, ते संशयास्पद आहेत. कोणतीही गोष्ट पाकिस्तानशी जोडायची आणि राष्ट्रपे्रम असल्याचा कांगावा करायचा, हे बरोबर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये जो खुलासा केला त्याचे मी जाहीर कौतुक करतो. एकीकडे हजार, पाचशेच्या नोटा बंद करायच्या आणि दुसरीकडे दोन हजारांची नोट काढायची. ही लढाई काळा पैसा रोखण्यासाठी आहे की काळा पैसा सहजरीत्या गोळा करता यावा यासाठी आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘७० हजार कोटींच्या बनावट नोटा चलनात असल्याचे ‘आरबीआय’ने पत्रकात म्हटले आहे. मात्र, या ७० हजार कोटींच्या बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी १६ हजार कोटी खर्च करून काय साध्य होणार आहे. त्यापेक्षा रिझर्व्ह बँकेने देशवासीयांना आपल्या पाचशे, हजारांच्या नोटा मुदत देऊन बँकेत येऊन तपासून घ्या, असे सांगितले असते तर काय बिघडले असते? देशात ०.००७ टक्के कागदी नोटा चलनात वापरल्या जातात. असे असताना सर्वसामान्य जनतेला पाचशेच्या नोटा बँकेत भरा आणि दोन-चार हजारांनी काढा, असे म्हणून वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे. सर्वसामान्य नागरिकाला या नोटा जमा करून मिळणारे पैसे म्हणजे त्यांची फसवणूक आहे. जे करायचे ते शुद्ध हेतूने करा. पाचशे, हजारांच्या नोटा रद्द केल्या आणि दोन हजारांची नोट चलनात आणली. त्यापाठोपाठच हजाराची नोटही चलनात येणार आहे. मग दोन हजारांची नोट कशासाठी? ही चलनात आणून काळे धन गोळा करणाऱ्यांना सोयीस्करच होणार नाही का? त्यापेक्षा १००, २०० आणि ५०० च्याच नोटा चलनात असाव्यात. देशात ३० टक्के लोक निरक्षर आहेत. त्याचबरोबर हमाल, माथाडी, शेतकरी वर्गाकडून चलने भरून बँकेत घेणे हे शक्य नाही. बँकेत खाती असली तरी बँकेचे व्यवहार करणे त्यांना समजत नाही, अशा नागरिकांना वेठीस धरून काय उपयोग? असा सवालही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी
काळा पैसा रोखण्यासाठी जनतेला वेठीस धरू नका
By admin | Published: November 11, 2016 10:49 PM