सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरू झालाय. तरीही टंचाईग्रस्तांना पाणी कमी पडू देऊ नका. वस्तुस्थिती जाणून घ्या. विनाकारण टँकर बंद करू नका. वाटल्यास खेपा कमी करा, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच यावेळी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कर्जात दोन कोटींपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्थायी समितीची सभा झाली. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे (ग्रामपंचायत), किरण सायमोते (पाणी व स्वच्छता), कृषी समिती सभापती मनोज पवार, शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याणचे सभापती शिवाजीराव सर्वगोड आदींसह विविध विभागांचे अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.या सभेत दुष्काळावर चर्चा घडून आली. जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आहे. ही चांगली गोष्ट असलीतरी अनेक ठिकाणी म्हणावसा पाऊस झालेला नाही. अशा स्थितीत टंचाईग्रस्तांसाठी सुरू असणारे टँकर वेळेत जातात का नाहीत, ते पाहावेत. पाऊस पुरेसा पडलाय का ? लोकांना योग्य प्रमाणात पाणी मिळतेय का ? हे पाहावे.
पाऊस सुरू झाला म्हणून टँकर बंद करू नका. वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यावा. वाटल्यास टँकरच्या खेपा कमी कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींची संख्या वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला.