सातारा : ‘नगराध्यक्षपदासाठी माझ्याविरोधात साताऱ्याच्या सुना उभ्या आहेत. मात्र, सातारकरांची लेक म्हणून मी नगराध्यक्षपदासाठी उभी आहे. ना सुनेचं... ना राणीचं...सातारकर ऐकतील आपल्या लेकीचं! असं माझं ठाम मत आहे. एकमेकांवर टीका करून माझ्या विरोधातील उमेदवारांनी आपली जागा दाखवून दिली आहे, यामुळे जनतेचे चांगलेच मनोरंजनही झाले,’ अशी बोचरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया बाबर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केली. प्रिया बाबर म्हणाल्या, ‘मी साताऱ्यात जन्माला आले आणि साताऱ्यातच वाढले आहे. त्यामुळे सातारकरांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या आहेत. शहरात वीज, पाणी, आरोग्य या मूळ समस्या कायम आहेत. शहरात कास तलाव, शहापूर पाणी योजना व कृष्णा नदीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो; तरीही साताऱ्यात मुबलक पाणीपुरवठा होत नाही. शहापूर योजना ही मोठी खर्चिक असली तरी ती सातारकरांच्या माथी मारण्यात आलेली आहे. कास तलावाच्या माध्यमातून सायफन पद्धतीने कमी खर्चात शहराला पाणी मिळते, परंतु या योजनेच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.’ ‘माझ्या वडिलांची विकासाची भूमिका पुढे घेऊन जाताना मला मनसे हाच पक्ष योग्य वाटला. इतर पक्ष वारंवार भूमिका बदलत आहेत. मनोमिलनाच्या सत्तेत असणारा भाजप आता दूर असला तरी काही दिवसांनी ते पुन्हा मनोमिलनासोबतच जातील, अशी शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्याला विकासाच्या मार्गावर न नेता आणखी मागे ठेवण्यात हे पक्ष भूमिका बजावत आले आहेत, हा विचार करूनच निर्णय घेतला.’ भूमिका बदलणाऱ्यांपेक्षा निष्ठेने आपलं काम करत राहणाऱ्यांचा माझ्या मनात आदरभाव आहे. माझे वडील अॅड. बाळासाहेब बाबर यांनी निष्ठेने शहरात नगरसेवक म्हणून सेवा बजावली आहे. माझे मार्गदर्शक संदीप मोझर हे सल्ला देतात. इतरांप्रमाणे ते आदेश देत नाहीत. साताऱ्यात अपेक्षित रोजगार उपलब्ध नसल्याने बाहेरगावी तरुणींना नोकरीला पाठवणे अनेक कुटुंबीयांना असुरक्षित वाटते. अशा अनेक मुली याचमुळे शिक्षण घेऊन घरी बसलेल्या आहेत.’ निवडणुकीआधीच मनोमिलन होणार की नाही, याच चर्चेभोवती सातारकरांना घोंगावत ठेवण्यात आलं, असंही प्रिया बाबर म्हणाल्या, मनोमिलन हा त्यांचा घरगुती विषय आहे. तो साताऱ्यातील संपूर्ण जनतेचा विषय नाही. महिनाभर सातारकरांचे नको तिकडे लक्ष वेधले गेले. शहर अगतिक राजेशाहीकडेच झुकले आहे, हेच यातून स्पष्ट होते. ‘मी शिस्त लावण्यासाठी पालिकेत येत आहे,’ असं म्हणून वेदांतिकाराजे भोसले यांनी समस्त सातारकरांवर बेशिस्त हा ठपका ठेवला आहे, अशी टीकाही प्रिया बाबर यांनी केली. मनोमिलनाच्या सत्तेला नगराध्यक्षपदाचाही आदर नव्हता. केवळ नावापुढे नगराध्यक्षपद लागावे, यासाठी शहरात मनोमिलनातील सत्तेत असणाऱ्या नगरसेवकांची स्पर्धाच सुरू होती. अनेक गुणवंतांना सत्तेपासून डावललं गेलं. ४० दिवसांचा नगराध्यक्ष, असा हास्यास्पद प्रकार केवळ साताऱ्यात पाहायला मिळाला, अशी खरमरीत टीकाही बाबर यांनी केली.
ना सुनेचं, ना राणीचं.. सातारकर
By admin | Published: November 09, 2016 1:09 AM